जुन्या वादातून एकास चाकूने भोसकले

Read Time:2 Minute, 46 Second

हिंगोली : शहरात जून्या वादातून एकास चाकूने भोसकल्याची घटना सोमवारी ता. १२ सायंकाळी सहा वाजता घडली आहे. यामध्ये पिंटू नारायण बालगुडे (३३) हे गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर हिंगोली च्या शासकिय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. तर चाकूने भोसकणा-या शेख फेरोज या व्यक्तीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील गवळीपूरा भागातील पिंटू नारायण बालगुडे हे आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उभे होते.

यावेळी तेथे शेख फेरोज (रा. महादेववाडी) हा तेथे आला. त्यानंतर त्या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादानंतर शेख फेरोज याने पिंटू यांच्या पाठीत चाकूचा वार केला. यामुळे त्यांच्या पाठीत खोलवर जखम होऊन रक्तस्त्राव सुरु झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक पंडीत कच्छवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक कातमांडे, जमादार गजानन होळकर, शेख शकील, सुधीर ढेंबरे, दिलीप बांगर, गणेश लेकुळे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी गंभीर जखमी असलेल्या पिंटू बालगुडे यास उपचारासाठी शासकिय रुग्णालयात हलविले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी नांदेड येथील शासकिय रुग्णालयात हलविले आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी शेख फेरोज याचा शोध सुरु केला आहे. जून्या वादातून हा प्रकार घडला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून या प्रकरणी रात्री उशीरा पर्यंत कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen + twelve =