August 19, 2022

जुने ड्रायव्हिंग लायसन्सची ऑनलाईन नोंदणी बंधनकारक

Read Time:3 Minute, 26 Second

नवी दिल्ली : देशातील सर्व प्रकारच्या वाहन चालकांसाठी केंद्राकडून महत्वाची सूचना जारी करण्यात आली असून, परिवहन विभागाने जुन्या ड्रायव्हिंग लायसनला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणखी एक संधी दिली आहे. जर तुम्ही तुमचे ड्रायंिव्हग लायसन ऑनलाईन रजिस्टर केलेले नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्या. यासाठीही मुदत आता कमी राहिली आहे. ती पुन्हा वाढविली जाणार नसल्याची सूचना परिवाहन विभागाने दिली आहे.

जर एखाद्या व्यक्तीकडे जुने ड्रायव्हिंग लायसन्स आहे आणि त्याने अद्याप ऑनलाइन नोंदणी केली नसेल, तर ती त्वरित करून घ्या, अन्यथा भविष्यात चकरा माराव्या लागतील. अशा परवानाधारकांना परिवहन विभागाकडून शेवटची संधी दिली जात आहे. परिवहन विभागाने देशातील सर्व जिल्ह्यांच्या डीटीओंना सूचना दिल्या आहेत. हस्तलिखित डीएल लवकरात लवकर ऑनलाइन करण्यात यावे, असे विभागाने म्हटले आहे. भारत सरकारच्या सारथी वेब पोर्टलवर १२ मार्च नंतर बॅकलॉग एंट्रीची तरतूद बंद केली जाणार आहे.

आधार लिंक करणेही अनिवार्य
आता तुमचा वाहन चालक परवाना आधारशी लिंक करणे देखील अनिवार्य करण्यात आले आहे. ज्यांचे परवाना पुस्तिकेत किंवा हस्तलिखिताद्वारे जारी केले गेले होते, त्यांचे लायसन्स आता ऑनलाइन जारी केले जातील. १२ मार्च रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत मूळ परवाना घेऊन परिवहन कार्यालयात दाखल होणे बंधनकारक आहे. त्यासाठी सर्व आरटीओंना आदेश जारी करण्यात आले आहेत.

संपूर्ण माहिती तात्काळ उपलब्ध होणार
परिवहन विभागाने सांगितले की, लोकांना हस्तलिखित परवाना ठेवण्यास खूप त्रास होतो, परंतु डिजिटल झाल्यानंतर, लोकांच्या लायसन्सची संपूर्ण माहिती काही मिनिटांत ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध होईल. प्रवासादरम्यान कुठेतरी तुमचा ड्रायंिव्हग लायसन्स हरवले किंवा चोरीला गेले, तर तुमच्यासाठी मोठी अडचण येत असे, परंतु, जर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स काही मिनिटांत इंटरनेटवर मिळून जाईल, त्यामुळे तुम्हाला अशा कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. तुमच्या मोबाईलमध्येही ते सहज उपलब्ध होईल. तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची संपूर्ण माहिती ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध असेल आणि वाहन मालकाला ती सहजतेने वापरता येणार असल्याने, नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

fourteen + fourteen =

Close