August 19, 2022

जीएसटी दरवाढीचाही शॉक?

Read Time:3 Minute, 13 Second

५ टक्क्यांचा स्लॅब ३ आणि ८ टक्क्यांत विभागणार
नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीने हैराण झालेल्या नागरिकांना आता जीएसटीच्या दरवाढीचाही शॉक बसण्याची शक्यता आहे. कारण लवकरच ५ टक्के कराचा स्लॅब हा ३ आणि ८ टक्के असा विभागला जाणार आहे. किती वस्तू ५ टक्के गटातून ३ टक्के गटात येतात आणि किती ८ टक्के गटात जातात, यावर या शॉकची तीव्रता अवलंबून असणार आहे.

देशात जीएसटीचे स्लॅब आता चारऐवजी पाच होण्याची शक्यता आहे. सध्याचा पाच टक्के कराचा स्लॅब हा ३ आणि ८ टक्के असा दोन भागांत विभागला जाण्याची शक्यता आहे. जीएसटी परिषदेची एक बैठक मे महिन्यात होणे अपेक्षित आहे. त्यावेळी याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सांगितले जात आहे. महसूल वाढीचा एक स्त्रोत म्हणून याला अनेक राज्यांची सहमती असल्याचेही म्हटले जाते.

जीएसटीचा कायदा १ जुलै २०१७ पासून लागू करताना राज्यांना होणा-या महसुली तुटीची भरपाई म्हणून केंद्र सरकार ५ वर्षे राज्यांना मदत करणार असे ठरले होते. याची मुदत येत्या जूनमध्ये संपत आहे. त्यामुळे राज्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी महसूलवाढीची गरज भासत आहे. त्यासाठीच ५ टक्के गटातल्या बहुतांश वस्तू ८ टक्के गटांत जाण्याची शक्यता आहे.

सध्या जीएसटीचे ५, १२, १८ आणि २८ टक्के असे चार टप्पे आहेत. याशिवाय सोने, सोन्यांच्या दागिन्यांवर ३ टक्के जीएसटी लागतो. तसेच पॅकेटरहित खाद्यपदार्थांसारख्या काही वस्तू आहेत, ज्यावर जीएसटी लागू होत नाही. जीएसटीपासून पूर्ण सवलत असलेल्या वस्तूंच्या संख्येत घट करून त्यातल्या काही ३ टक्के गटात टाकण्याचाही विचार सुरू आहे. खाद्यतेल, मसाले, चहा, कॉफी, मिठाई, अगरबत्तीसारख्या अनेक वस्तू ५ टक्के स्लॅबमध्ये येतात.

१ टक्के स्लॅब वाढला तरी
५० हजार कोटी मिळतात
५ टक्के स्लॅबमध्ये १ टक्क्याची वाढ झाली तरी ५० हजार कोटी रुपयांनी महसूल वाढू शकतो. हा स्लॅब नेमका किती वाढणार..७, ८ की ९ टक्के यावर अजून निर्णय नाही. पण जास्त शक्यता आहे की तो वाढून ८ टक्के केला जाऊ शकतो. जीएसटी परिषदेच्या बैठकीतच यावर अंतिम निर्णय होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

14 − 4 =

Close