नांदेड जिल्ह्यात लसीकरणाची बोंबाबोंब…

Read Time:5 Minute, 59 Second

नांदेड : संपूर्ण देशात कोव्हिड लस संदर्भात ओरड होत आहे. तसाच काही प्रकार नांदेड जिल्ह्यात घडत असल्याचे गेल्या आठ दिवसापासून पहावयास मिळत आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्यामुळे नांदेडकरांना लसीपासून वंचित रहावे लागत आहे. राजकीय मंडळी केवळ आरोप प्रत्यारोपामध्ये गुंग असल्यामुळे सामान्य नागरिकांसाठी वेळ नसल्यामुळे मतदान करणा-या नागरिकांना आता खरी जाण होत आहे. जीवापेक्षा पैसा मोठा नसतो त्यामुळे भविष्यात पैशापेक्षा व्यक्ती पाहून मतदान करा, असे जाहिर वक्तव्य सामान्य नागरिकांच्या तोंडून निघत आहे. लसीचा पुरवठा होत नसल्यामुळे जिल्ह्यात कोव्हिड लसीसंदर्भात बोंबाबोंब होत असल्याचे दृश्य पहावयास मिळत आहे.

राज्यात लसीचा पुरवठा होत नसल्याची ओरड सर्वच स्तरातून होत आहे. विविध राजकीय मंडळी आरोप प्रत्यारोप करीत आहेत. विरोधक म्हणत आहेत वाजवीपेक्षा जास्त लसींची मागणी होत असल्यामुळे पुरवठा केला जात नाही. तर सत्ताधारी म्हणत आहेत पूर्ण देशात लसींचा तुटवडा असल्याचे सांगण्यासाठी केंद्र तयार नाही. महाराष्ट्र राज्यात महाआघाडीची सत्ता असल्यामुळे हेतुपुरस्सर त्रास दिला जात असल्याची वल्गना केली जात असली तरी राजकीय मंडळीमुळे आजघडीला सामान्य नागरिक मात्र होरपळून निघत आहे.[woo_product_slider id=”480″]

नांदेड जिल्ह्यात मागील आठवड्यात २0 हजाराचा पुरवठा करण्यात आला होता त्यापैकी १0 हजार महापालिका, १६ ग्रामीण रुग्णालयासाठी ५00 प्रमाणे ८000, मेडिकल कॉलेजसाठी ५00, गुरु गोविंदसिंघजी रुग्णालय १000, मनपा स्त्री रुग्णालयासाठी ५00 पुरवठा करण्यात आला ततर या आठवड्यात केवळ ४२८0 लसचा पुरवठा पुणे मार्फत लातूरहून नांदेडला करण्यात आला आहे. त्यापैकी २ हजार महापालिका व २ हजार ग्रामीणसाठी देण्यात आला असून केवळ २८0 आजघडीला शिल्लक आहेत. कोव्हिड लसीपेक्षा कोव्हॅक्सीन लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे. मागणी जास्त असल्यामुळे सर्वच नागरिकांना वेळीच लस देणे शक्य होणार नाही. त्यासाठी राज्य शासनाकडूनच लोकसंख्येच्या प्रमाणात पुरवठा होणे आवश्यक आहे. त्यानंतर लसी संदर्भातील ओरड थांबणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

लसीसंदर्भात समन्वय नसल्यामुळे आज नांदेड शहरात महापालिकेतर्फे १५ आरोग्य केंद्राच्या ठिकाणी लस देण्याची व्यवस्था करण्यात आली असली तरी या ठिकाणी लस उपलब्ध नसल्यामुळे अनेक नागरिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी चकरा मारत आहेत. महापालिकेतर्फे भ्रमणध्वणीवर मेसेज दिले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र लसीचा तुटवडा असल्यामुळे नागरिकांना विना लस घेता परत जावे लागत आहे. यावर वेळीच अंकुश न ठेवल्यास मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहिली लस घेणा-यांना दुसरी लस मिळत असली तरी नव्याने घेणा-यांना लसच उपलब्ध नाही. देशात १ मे पासुन १८ वर्षावरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी १ मे नंतर मात्र या पेक्षा मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार आहे. त्यामुळे येणा-या काळात लसीसाठी युवक मंडळींनी मारहाण केली तर नवल ठरणार नाही. त्यासाठी जिल्हा प्रशासनासह महापालिकेने वेळीच दक्षता घेवून बंदोबस्त करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येते.

लसीचे असे झाले वितरण
जिल्हा आरोग्य अधिका-यांच्या नियंत्रनात कोविड लसीचे वितरण केले जात आहे.यात कोवीशिल्ड १५० प्रत्येक आरोग्य केंद्र,महापालिका २ हजार,ग्रामीण रूग्णालयास कोव्हॅक्सीन १०० व कोवीशिल्ड ५०, जिल्हा शासकीय रूग्णालय कोवीशिल्ड २०० व कोव्हॅक्सीन २००,जीएमसी कोवीशिल्ड २०० व कोव्हॅक्सीन २०० लसीचे कालपर्यंत वितरण करण्यात आले आहे.तर १२६०० कोवीशिल्ड लस आठवड्यात वितरीत करण्यात आल्या आहेत,अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.

two × 4 =