जिल्हा आरोग्य अधिकारी – VastavNEWSLive.com


नांदेड- मागील काही दिवसांपासून उन्हाळ्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. राष्ट्रीय हवामान विभागाकडे ३ एप्रिल 2024 रोजी देशातील पश्चिम राजस्थान, उत्तर पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, उत्तर गुजरात व मराठवाड्यात सर्वाधिक तापमानाची ४१ ते ४३°C नोंद झाल्याचे आढळून आले आहे. तसेच अकोला येथे ४४°C ही देशातील सर्वाधिक तापमाणाची नोंद करण्यात आली आहे. तसेच येणाऱ्या पुढच्या पाच दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये सुध्दा तापमान वाढ कायम राहण्याचे संकेत आहेत. नागरिकांमध्ये तापमानवाढ, उष्णतेची लाट याबाबत जागरुकता निर्माण होणे गरजेचे असून, यासाठी सर्वसामान्य लोकांना संभाव्य तापमानवाढीचे संकेत लक्षात यावेत यासाठी कलर कोडींगचा वापर हवामान विभागाकडून केला जातो.

उदा. पांढरा रंग सर्वसामान्य दिवस (नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा कमी तापमान), पिवळा अलर्ट उष्ण दिवस (जवळपास नेहमीच्या कमाल तापमानाएवढे तापमान), केशरी अलर्ट उष्णतेची मध्यम स्वरुपाची लाट (नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा 4 ते 5 डिग्री सेल्सियस जास्त तापमान), लाल अलर्ट अत्यंत उष्ण दिवस (नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा 6 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान) उष्माघात होऊ नये यासाठी प्रत्येकाने जागरूक राहीले पाहीजे. उन्हाळयामध्ये उष्माघाताने रुग्णांवर उपाययोजना करण्यासाठी व मृत्यू टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून, आरोग्य संस्थांमध्ये उष्माघात उपचार कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेऊन उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.एम. शिंदे यांनी केले आहे.

उष्माघात होण्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत :- उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजूरीची कामे फार वेळ करणे, कारखान्याच्या वॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपडयांचा वापर करणे, अशा प्रत्यक्ष उप्ततेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबध येण्याने उष्माघात होतो.

उष्माघातामध्ये पुढील लक्षणे दिसून येतात :-थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भुक न लागणे, चक्कर, येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, पोटऱ्यात वेदना येणे अथवा पेटके येणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बैचैन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था इत्यादी.

उष्माघातामध्ये अतिजोखमीचे घटक खालील प्रमाणे आहेत :-65 वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती, 1 वर्षाखालील व 1 ते 5 वयोगटातील मुले, गरोदर माता, मधुमेह व हृदयविकार तसेच अल्कोहोलीक व्यक्ती, अतिउष्ण वात्तावरणामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती.

 उष्माघात होऊ नये या करीता काय करावे तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी प्यावे, हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री/टोपी, बुट व चपलांचा वापर करावा, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी, उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा, शरीरातील पाण्याचे प्रमाणे कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबूपाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करावा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसल्याची चिन्हे ओळखावित व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात, पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे, कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, सुर्य प्रकाशाचा थेट सबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात यावे, पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा. बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा, गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घ्यावी, रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरीता शेड उभारावेत, जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी.

उष्माघात होऊ नये या करीता काय करु नये-लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये. दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी.

प्रतिबंधक उपाय-वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत. उष्णता शोषुन घेणारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे) वापरु नयेत, सैल पांढ-या रंगांचे कपडे वापरावेत. जलसंजीवनीचा वापर करावा, पाणी भरपूर प्यावे. सरबत प्यावे. अधुन मधुन उन्हामध्ये काम करणे टाळावे व सावलीत विश्रांती घ्यावी. वरील लक्षणे सुरु होताच ताबडतोब उन्हात काम करणे थांबवावे व उपचार सुरु करावा. उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपकरणे, यांचा वापर करावा.

तालुकास्तरावरील व प्रा.आ.केंद्रावरील उष्माघात नियंत्रण कक्ष:-जिल्हयात एकुण 14 ग्रामीण रुग्णालये व 6 उपजिल्हा रुग्णालय व तसेच जिल्हयात एकुण 68 प्राथमिक आरोग्य केंद्र असुन एकुण 379 उपकेंद्र आहेत. ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व प्रा.आ.केंद्र स्तरावर उष्माघात नियत्रंण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.

उपचार-रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावे अथवा वातानुकूलित खोलीत ठेवावे. रुग्णांच्या शरीराचे तापमानात खाली आणण्याचा दृष्टीने प्रयत्न करावेत. रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी. रुग्णांच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवाव्यात.


Post Views: 31


Share this article:
Previous Post: पोलीस मैदानावर महाराष्ट्र दिनाचा 1 मे रोजी सकाळी शासकीय समारंभ

April 29, 2024 - In Uncategorized

Next Post: भरधाव ट्रकने 9 दुचाकींना धडक दिली; एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी

April 30, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.