January 21, 2022

जप्त संपत्तीशी अजित पवारांचा संंबंध नाही

Read Time:2 Minute, 47 Second

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालमत्तेवर आयकर विभागाने कारवाई सुरू केली असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. अजित पवारांशी संबंधित कोट्यवधींच्या संपत्तीवर जप्ती आणण्याचे आदेश देण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. मात्र, अजित पवार यांच्याकडून या वृत्ताचा स्पष्टपणे इन्कार करण्यात आलेला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणलेली नाही किंवा त्यासंदर्भातील कोणतीही नोटीस अजित पवार यांना प्राप्त झालेली नाही. यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमात येत असलेले वृत्त निराधार, वस्तुस्थितीशी विसंगत, खोडसाळपणाचे आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वकील अ‍ॅड. प्रशांत पाटील यांच्याकडून करण्यात आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रसारीत होत असलेल्या बातम्यांचे खंडन करताना त्यांचे वकील अ‍ॅड. प्रशांत पाटील म्हणाले की, अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच आलेली नाहीकिंवा त्यासंदर्भात नोटीसही बजावण्यात आलेली नाही. आयकर विभागाकडून काही मुद्यांवर स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. त्या पत्राला योग्य ते उत्तर देण्यात येईल, असे अ‍ॅड. पाटील यांनी म्हटले आहे.

या प्रकरणी प्रशासकीय आणि कायदेशीर मार्गाने योग्य ती कार्यवाही केली जाईल, असंही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, प्रसिद्धीमाध्यमांनी वस्तुस्थिती तपासून बातम्या द्याव्यात व कुठलाही अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

11 − 8 =

Close