August 9, 2022

जगात २२ देशांत कोरोनाची तिसरी लाट

Read Time:4 Minute, 37 Second

भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. येथे एका दिवसात सव्वा लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. एकीकडे भारतात कोरोना रुग्ण वाढत असतानाच जगभरातील २२ देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली आहे. यात प्रामुख्याने ब्राझील, फ्रान्स, युक्रेन आणि रशियाचा समावेश आहे. जगभरात सोमवारपर्यंत कोरोनाचे १३ कोटी ३० लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी २८ लाख ८६ हजार जणांचा मृत्यू झाला, तर १० कोटी ७२ लाख जणांनी कोरोनावर मात केली. जगभरात २ कोटी २८ लाख लोकांवर उपचार सुरू आहेत. यात २ कोटी २७ लाख रुग्णांमध्ये कोरोनाची कमी अधिक प्रमाणात लक्षणे दिसून येत आहेत, तर ९९ हजार ५०० हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

सध्या जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने होत असून यासंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. धक्कादायक म्हणजे जगातील अनेक देशांत लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतरही वेगाने कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. जगभरात कोरोनाची दुसरी लाट सर्वाधिक घातक ठरली आहे. या दुस-या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे आणि सर्वाधिक मृत्यूही याच कालावधीत झाले. २१ फेब्रुवारी रोजी जगात सर्वात कमी म्हणजे तीन लाख २२ हजार रुग्ण आढळून आले होते. यानंतर मात्र रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

अमेरिकेत एका दिवसात ३ लाख ८० हजार रुग्ण
अमेरिकेत पहिल्या लाटेत ८० हजारांहून अधिक रुग्ण एका दिवसात आढळून येत होते. दुस-या लाटेत या संख्येत १ हजार पटींनी वाढ झाल्याचे दिसून आले. दुस-या लाटेत एका दिवशी अमेरिकेत तब्बल ३ लाख ८० हजार रुग्णही आढळून येत आहेत. ब्राझीलमध्येही पहिल्या लाटेत दिवसाला ७० हजार रुग्ण आढळून यायचे, आता ती संख्या ९७ हजारांहून अधिक झाली आहे.

युरोपमध्ये ११ लाख मृत्यू
युरोपमधील ५१ देशांमध्ये आतापर्यंत ११ लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. युनायटेडकिंंग्डम, रशिया, फ्रान्स, इटली आणि जर्मनीसह पाच युरोपीयन देशांत एकूण कोरोना मृत्यूंपैकी ६० टक्के मृत्यूंची नोंद झाली आहे, तर अमेरिकेत कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या ५ लाख ५५ हजार इतकी आहे. कोणत्याही देशात कोरोनामुळे झालेले हे सर्वाधिक मृत्यू आहेत.

३७ कोटी लोकांना कोरोनाची लस
अवर वर्ल्ड इन डेटाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार रविवारपर्यंत किमान ३७ कोटी ३० लाख जणांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जगातील गरीब देशांना लस पुरवठा करण्यासाठी मोठ्या देशांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे.

भारतात सव्वालाख रुग्णांची भर
देशात पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णसंख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला. गेल्या २४ तासांत देशात सव्वा लाखांहून अधिक म्हणजे १ लाख २६ हजार ७८९ नवे कोरोना रुग्ण आढळले, तर ६८५ रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच ५९ हजार २५८ जण उपचारानंतर बरे झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

one × three =

Close