
जगभरात कोरोना लाट उसळली
वॉशिंग्टन/नवी दिल्ली : भारतासह संपूर्ण जगातील कोरोना रुग्ण संख्या गेल्या काही दिवसांत पुन्हा वाढली आहे. भारतात रोज आढळणा-या कोरोना रुग्णांची संख्या ४० हजारच्या जवळपास आहे. तर, जगात गेल्या आठवड्यात कोरोनाचे ३४ लाख नवे रुग्ण समोर आले. जागतिक आरोग्य संखटनेने म्हटले आहे, की गेल्या आठवड्यात ३.४ मिलियनहून अधिक कोरोना रुग्ण समोर आले आहेत. ही संख्या या पूर्वीच्या आठवड्याच्या तुलनेत १२ टक्क्यांनी अधिक आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, मृतांची संख्या सातत्याने कमी होत आहे. गेल्या आठवड्यात जगभरात ५७,००० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू वेस्टर्न पॅसिफिक आणि युरोपीयन देशांत झाले आहेत. गेल्या आठवड्यात डब्ल्यूएचओने म्हटले होते, की कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण इंडोनेशिया, इंग्लंड, ब्राझील, भारत आणि अमेरिकेत होते. भारतासंदर्भात बोलायचे झाल्यास, कोरोनाच्या दुस-या लाटेनंतर झालेल्या एका सिरो सर्व्हेनुसार (देशव्यापी सर्वेक्षण) जवळपास ४० कोटी लोकांना कोरोनाचा धोका आहे. या सर्वेत असेही सांगण्यात आले आहे, की ६ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या देशातील नागरिकांपैकी दोन तृतियांश लोकांत सार्स-सीओव्ही-२ अँटीबॉडी आढळून आली आहे. रिपोर्टनुसार देशातील एक तृतियांश लोकांत ही अँटीबॉडी नाही. याचाच अर्थ जवळपास ४० कोटी लोकांना अजूनही कोरोना व्हायरस संक्रमणाचा धोका आहे.
या रांज्यांत संक्रमन अधिक
महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि इशान्येकडील अनेक राज्यांत मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण समोर येत आहेत. केरल, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड या राज्यांत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. चिंतेचा विषय म्हणजे, महिन्याच्या सुरुवातीला यांपैकी काही राज्यांत संक्रमण दर अत्यंत कमी झाला होता. मात्र, आता हळू-हळू रुग्ण संख्या पुन्हा वाढताना दिसत आहेत.