
चीन सरकारने लपवला कोरोनाबळींचा आकडा!
बीजिंग : कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. याच दरम्यान चीनवर आता गंभीर आरोप करण्यात आला आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या खूप जास्त आहे, असा दावा एका विश्लेषकाने केला आहे. चीनने मृतांची खरी आकडेवारी लपवून ठेवली असून, मृतांचा आकडा ४६०० नव्हे, तर १७ हजार टक्के जास्त असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे चीनमधील कोरोना मृतांचा आकडा १७ लाख असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दुसरीकडे बीजिंगने कोरोनामुळे ४ हजार ६३६ लोकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
चीनमध्ये जगातील सर्वांत कडक लॉकडाऊन लागू असताना मृतांच्या आकडेवारीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. द सनने दिलेल्या रिपोर्टनुसार स्टीव्हन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या क्वांटिटेटिव्ह फायनान्स प्रोग्रामचे संचालक जॉर्ज कॅलहॉन यांनी हा गंभीर आरोप केला आहे. चीनने आपली राजकीय प्रतिमा खराब होऊ नये, म्हणून मृत्यूची आकडेवारी लपविली आहे. द इकॉनॉमिस्टने विकसित केलेल्या मॉडेलद्वारे जारी केलेल्या डेटाचा अभ्यास करणा-या तज्ज्ञांनी द इपोच टाईम्सला सांगितले की, चीनमधील अधिकृत आकडेवारी सांख्यिकीयदृष्ट्या अशक्य आहे. एप्रिल २०२० पासून बीजिंगमध्ये अधिका-यांनी फक्त दोन मृत्यूची नोंद केली आहे. अशा प्रकारे कोरोनामुळे सर्वांत कमी मृत्यू झालेल्या देशांमध्ये चीनचे नाव समाविष्ट झाले.
जॉर्ज कॅलहॉनचा दावा
जॉर्ज कॅलहॉन यांनी दिलेल्या माहितीनुसार हे असंभव आहे. वैद्यकीयदृष्ट्या अशक्य आहे. हे लक्षात ठेवले पाहिजे की, २०२० मध्ये कोणतीही कोरोना लस नव्हती आणि उपचारही नव्हते. अशा परिस्थितीत चीनमध्ये कोणत्याही संरक्षणाशिवाय लोकसंख्या जास्त होती, तरीही कोविड मृत्यू शून्य झाले आहेत, असे कसे शक्य आहे? कॅलहॉनच्या म्हणण्यानुसार चीनची अधिकृत मृत्यूची संख्या सुमारे १७ हजार टक्के कमी नोंदली गेली आहे.