July 1, 2022

चीनची घुसखोरी!

Read Time:10 Minute, 0 Second

भारतीय हद्दीत चीनची घुसखोरी ही काही आता नवी गोष्ट राहिलेली नाही. अधूनमधून अशा चिनी कागाळ्या सुरूच असतात. ‘हिंदी-चिनी भाई-भाई’ असा नारा देत चीनने १९६२ मध्ये भारतावर युद्ध लादले तेव्हापासून दोन्ही देशांतील संबंध कमालीचे बिघडले आहेत. भारताला शांत जीवन जगू द्यायचे नाही असा जणू काही विडाच चीनने उचलला आहे. पाकिस्तानला हाताशी धरून चीनच्या कागाळ्या सुरूच असतात. भारतीय लष्कराला याची जाणीव आहे म्हणून याबाबत ते डोळ्यात तेल घालून दक्ष असते. सीमावाद ही दोन्ही देशांसाठी कायमची डोकेदुखी राहिली आहे. सीमेवर चीनने मोठे लष्कर तैनात केले आहे. चीनने पूर्व लडाख आणि उत्तर आघाडी ते पूर्व विभागापर्यंत सैन्याची तैनात वाढवली असून भारताच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. लडाख सीमेलगतच्या भागातून सैन्य माघार घेण्याबाबत दोन्ही देशांदरम्यान चर्चेच्या डझनभर फे-या झाल्या आहेत पण चर्चेची तेरावी फेरी सुरू होण्याआधीच त्या भागात चीनने मोठी सैन्य जमवाजमव केली आहे.

या संदर्भात लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांनी म्हटले आहे की, लडाख परिसरातील चिनी सैन्याच्या हालचालींवर आमचे बारीक लक्ष आहे. आम्हीही सीमेवर पायाभूत सुविधा विकसित करीत आहोत. त्यात कुठल्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य तैनातीचाही समावेश आहे. सध्या तरी आम्ही कुठल्याही परिस्थितीस तोंड देण्यासाठी सज्ज आहोत. सज्जतेचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख नरवणे यांनी नुकताच पूर्व लडाख दौरा केला. ‘रेझांग ला’ आणि ‘रेशिन ला’ या दोन्ही ठिकाणांहून दोन्ही देशांनी फेबु्रवारीत सैन्य माघार घेतली होती. फेब्रुवारीत दोन्ही देशांचे सैन्य आणि रणगाडे काही मीटर अंतरावर सज्ज ठेवण्यात आले होते. त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोग्रा छावणीपासून माघार घेतली. पण हॉट स्प्रिंग हा अद्याप वादाचा मुद्दा आहे. हॉट स्प्रिंगशिवाय चिनी सैन्याने भारतीय सैन्याला देसपांग येथील पठारावर गस्त घालण्यास रोखले असून हे ठिकाण दौलत बेग ओल्डीजवळ उत्तरेस आहे.

१९६२ च्या युद्धात दौलत बेग ओल्डी येथे भारतीय सैन्याने पराक्रमाची कमाल दाखवली होती. गोग्रा येथील गस्त बिंदूपासून चीनने माघार घेण्याचे कबूल केले होते. त्यावेळी दोन्ही देशांदरम्यान चर्चेची बारावी फेरी झाली होती. चर्चा झाल्यानंतर त्यानुसार चीन वागत नाही असे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. म्हणून लष्करप्रमुख नरवणे यांनी म्हटले आहे की, जोवर दोन्ही देशांत सीमा करार होत नाही तोवर सीमेवरील घडामोडी सुरूच राहतील. सध्या सीमेवरील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आम्ही चीनच्या कुठल्याही आगळिकीस तोंड देण्यास तयार आहोत. याआधीही आम्ही ते दाखवून दिले आहे. सीमा करार होत नाही तोपर्यंत वाद चालूच राहणार. भारत-चीन सीमेवर कायम शांततेसाठी हा करार गरजेचा आहे. जोवर दीर्घकालीन तोडगा काढला जात नाही तोवर अशा प्रकारच्या घटना घडतच राहतील. हा तोडगा म्हणजे सीमा करार. चिनी घुसखोरीची ताजी घटना म्हणजे तिबेट सीमेजवळ त्यांनी केलेली कागाळी! नुकतीच चिनी लष्कराच्या २०० सैनिकांनी तिबेटच्या सीमेजवळ भारतीय प्रदेशात घुसखोरी केली. अरुणाचल प्रदेशच्या तवांग भागामध्ये भारतीय सीमेत घुसखोरी करणा-या चिनी सैनिकांना भारताने ताब्यात घेतले.

२०० चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली आणि या ठिकाणी सैनिक तैनात नसलेल्या बंकर्सची नासधूस केली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ बूमला आणि यांग त्से प्रदेशामध्ये गत आठवड्यात घुसखोरीचा हा प्रकार घडला. या प्रकारानंतर स्थानिक लष्करी अधिका-यांशी चर्चा झाल्यानंतर या सैनिकांना सोडून देण्यात आले. भारत आणि चीनमधील सीमांची ठोस निश्चिती करण्यात आलेली नाही. त्यामुळे दोन्ही देशांकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंदर्भात वेगवेगळे दावे केले जातात. दोन्ही देशांमधील समझोते व अन्य करारांनुसार या ठिकाणी शांतता ठेवण्याला प्राधान्य असले तरी सीमा निश्चिती नसल्याने घुसखोरीबाबत वाद होतात. या प्रदेशात चीनची घुसखोरी काही नवीन नाही. २०१६ मध्ये चीनचे २०० हून अधिक सैनिक भारतीय हद्दीत घुसले होते. मात्र काही तासांनंतर ते आपल्या प्रदेशात परत गेले. २०११ मध्ये भारतीय सीमेमध्ये असणारी २५० मीटर उंचीची भिंत सर करण्याचा प्रयत्न चिनी सैनिकांनी केला होता. तवांग हा प्रदेश नेहमीच भारत आणि चीनमधील संघर्षाचा महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे.

१९६२ मध्ये चीनने या प्रदेशावर ताबा मिळविला होता. त्यावेळी काही दिवस या प्रदेशावर ताबा ठेवल्यानंतर चीनने हा भाग तिबेटचा हिस्सा असल्याचे म्हटले होते. तर तिबेटने अरुणाचल प्रदेशचा भाग हा दक्षिण तिबेट असल्याचे म्हटले होते. तवांग प्रांताला ऐतिहासिक महत्त्व आहे. सहावे दलाई लामा यांचे ते जन्मस्थान आहे. तिबेटियन बौद्धांसाठी पवित्र मानले जाणारे ल्हासा सुद्धा याच प्रांतात आहे. १९६२ च्या युद्धानंतर चीनने दोन्ही देशांतल्या न सुटलेल्या सीमावादाचा वापर करत भारताला सतत दबावाखाली ठेवले. दरम्यान मिळालेल्या अवधीत या भागातील आपल्या पायाभूत सुविधा वाढवल्या. चिनी प्रदेशात चीनने अनेक लष्करी ठाणी, हवाई धावपट्ट्या, रेल्वे रस्तामार्ग बांधले. त्यामुळे चीन अल्पावधीत भारत-चीन सीमेवर सैन्य व युद्ध सामग्री आणू शकतो. चीनची ही तयारी लक्षात घेऊन भारतानेही तोडीस तोड उत्तर देताना सीमा भागातील रस्ते बांधणी, हवाई पट्ट्यांची निर्मिती व अन्य पायाभूत सुविधा निर्माण केल्या. त्यात आणखी भर घालण्याचे काम सुरू आहे.

पूर्व लडाखमधील चीनच्या घुसखोरीनंतर भारताने लडाख व अरुणाचल सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य व युद्धसामुग्री आणून ठेवली आहे. या भागात नवे रस्ते व पूल बांधणीवर जोर दिला आहे. पर्वत व द-या-खो-यांच्या या भागात सतत कोसळणारा पाऊस व कडे कोसळण्याच्या घटनांमुळे अनेकवेळा रस्तामार्ग बंद पडतो. त्यामुळे या भागात सैन्याच्या हालचाली करण्यासाठी हेलिकॉप्टर तळ व हवाई धावपट्ट्या तयार करण्यावर भारतीय लष्कराने भर दिला आहे. एकप्रकारे चीनला हा इशाराच आहे. चीनने भारतीय लष्करावर आणि अर्थव्यवस्थेवर ताण आणण्याच्या उद्देशाने लडाखमध्ये घुसखोरी केली पण त्यांचा हा डाव त्यांच्यावरच उलटला आहे. आता चिनी सैन्याला हिमालयात कायमचे अडकून रहावे लागणार आहे. लडाख व अरुणाचलमधील भारतीय सैन्याचा दबाव कमी करण्यासाठी चीनने हिमाचल सीमेजवळ घुसखोरी केली पण भारतासाठी लावलेल्या सापळ्यात चीनच अडकणार असे दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published.

11 + 15 =

Close