August 19, 2022

चिपी विमानतळावरून राणेंचा यू-टर्न

Read Time:4 Minute, 3 Second

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेत चांगलीच जुंपल्याचे चित्र पहायला मिळाले. हा वाद निवळत असताना तीन दिवसांपूर्वी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख ठरल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला यायलाच पाहिजे असे काही नाही, असे राणे म्हणाले होते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी यू-टर्न घेतला आहे. मुख्यमंत्री ठाकरे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू, असे त्यांनी म्हटलेय.

‘‘विकासाची प्रत्येक गोष्ट माझं स्वप्नच आहे. सिंधुदुर्गात विमानतळ मी स्वत: बांधलं आहे. मी मंत्री असताना बांधून पूर्ण केलं आहे. हे विमानतळ ९ ऑक्टोबरला सुरू होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. श्रेय कसलं? जे कोण बोलतंय त्यांचं सिंधुदुर्गाच्या विकासात एक टक्क्याचं श्रेय नाही. विमानतळ बांधून मी पूर्ण केलंय त्यामुळे श्रेयाचा प्रश्न येतोच कुठे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्घाटनाला आले तर त्यांचं स्वागत करू, असे राणे म्हणाले.

यावेळी बोलताना गणेशोत्सवावरील निर्बंधावरूनही नारायण राणेंनी ठाकरे सरकारवर टीका केली. सणांवर निर्बंध असू नयेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच फक्त हिंदूंच्याच सणांवर असे निर्बंध घालणं योग्य नाही. मी असे निर्बंध मानत नाही. त्यांना काय करायचं ते करू देत, असंही राणे म्हणाले.
काय म्हणाले होते राणे..

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी ७ सप्टेंबरला पत्रकार परिषद घेऊन चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर केली होती. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमाला बोलावणार का?, असा प्रश्न उपस्थित पत्रकारांनी विचारला असता ‘मुख्यमंत्री पाहिजेत असं नाही’, असे उत्तर त्यांनी दिले. ‘‘क्रेडिट घेण्याचा प्रश्नच नाही. मी २०१४ सालापर्यंत विमानतळ बांधून पूर्ण केलं. मी स्थानिक नाही का? आम्ही स्थानिक असल्याने आणि विमानतळ बांधल्याने आमचा अधिकार आहे. पर्यटन जिल्हा आम्ही जाहीर केला. कुणी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेना कोणत्या आधारावर बोलते हे माहिती नाही. मी संबंधित मंत्र्यांशी याबाबत बोललो आहे.’’, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले होते.

बाप्पाला प्रार्थना
गणपती बाप्पाने आतापर्यंत राणे कुटुंबियांना सुखी- समाधानी ठेवलेलं आहे. राज्यातील कोरोनाचे संकट दूर व्हावे आणि राज्यात सुख-समृद्धी नांदावी यासाठी नारायण राणेंनी गणराया चरणी प्रार्थना केली आहे. नारायण राणेंनी त्यांच्या मुंबईतील घरी गणपतीची स्थापना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

five × four =

Close