चिनी मोबाईल कंपन्यांवर छापे

Read Time:3 Minute, 17 Second

टॅक्स चोरी प्रकरणी आयकर विभागाने टाकल्या धाडी

नवी दिल्ली: टॅक्स चोरी प्रकरणी आयकर विभागाने आघाडीच्या चिनी मोबाइल कंपन्यांना सर्वात मोठा दणका दिला आहे. आज सकाळी ९ वाजल्यापासून दिल्ली, मुंबई व देशातील अन्य प्रमुख भागांत चिनी मोबाइल कंपन्यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले असून ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरूच होती.
भारतात सेवा देत असलेल्या चिनी मोबाइल कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात टॅक्सचोरी केली जात असल्याचे आढळून आले होते. त्या आधारावर आयकर विभागाने आज एकाचवेळी देशभरात चिनी मोबाइल कंपन्यांच्या ठिकाणांवर छापे टाकले. आज सकाळी ९ वाजता ही कारवाई सुरू करण्यात आली. आयकर विभागाच्या पथकांनी दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरू व अन्य ठिकाणी छापे टाकल्याचे सांगण्यात येत आहे.
दिल्लीत ओप्पो मोबाइल कंपनी तसेच कंपनीच्या विक्रेत्यांवर छापे टाकण्यात आले आहेत. चिनी सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या झेडटीई या विक्रेत्यालाही दणका देण्यात आला. खोट्या कंपन्या दाखवून चिनी कंपन्या टॅक्स चोरी करत असल्याचे पुरावे आयकर विभागाच्या हाती लागले असून आजच्या छापेमारीतून त्याबाबत महत्त्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे. या कंपन्यांचे विक्रेते आणि वितरक हेसुद्धा संशयाच्या भोव-यात सापडले असून त्यांनाही दणका देण्यात आला आहे.
देशभरात २४ पेक्षा
जास्त ठिकाणी छापे
आयकर विभागाने आघाडीच्या चिनी मोबाइल कंपन्यांना दणका दिला आहे. त्यात ओप्पो, शाओमी आणि वन प्लस या कंपन्यांचा समावेश आहे. मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, ग्रेटर नोएडा, कोलकाता, गुवाहाटी, इंदूर आणि अन्य अशा किमान २४ ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत.
मोठ्या प्रमाणात कर चोरी
चिनी कंपन्या मोठ्या प्रमाणात टॅक्स चोरी करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्याबाबत अधिक पुरावे हाती आल्यानंतर त्याआधारे ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या कारवाईत महत्त्वाचा डिजिटल डेटा हाती लागला असून त्याबाबत लगेचच अधिक तपशील देता येणार नाही, असेही सूत्रांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

one + 9 =