August 19, 2022

चक्क ट्रेनला द्यावा लागला ‘दे धक्का’

Read Time:2 Minute, 30 Second

भोपाळ : तुम्ही रस्त्यावर बंद पडलेल्या वाहनांना धक्का मारून बाजूला नेताना किंवा सुरू करताना अनेकदा पाहिले असेल. मात्र तुम्ही कधी ट्रेनला धक्का मारताना पाहिले आहे का? मात्र अशीच एक दे धक्का घटना समोर आली आहे. मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर बंद पडलेल्या एका रेल्वे निरीक्षण ट्रेनला मजुरांनी धक्का मारून मेन लाईनवरून हटवले. ही घटना मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील टिमरनी रेल्वे स्टेशनवर घडली आहे. या रेल्वेमार्गावर गाड्यांची वर्दळ असल्याने ट्रेनमध्ये बिघाड झाल्यावर तिथे उपस्थित असलेल्या अधिका-यांनी आणि कर्मचा-यांनी इंजिनाची वाट न पाहता ही ट्रेन मुख्य मार्गावरून हटवली.

त्याचे झाले असे की, टिमरनी रेल्वे स्टेशनवरील अप ट्रॅकवर (मुंबई कडून इटारसीकडे जाणारा) ओव्हरहेड लाइन दुरुस्त करणारी ट्रेनमध्ये (टॉवर वॅगन) तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे इन्स्पेक्शन ट्रेन मेन लाईनवर उभी राहिली. तसेच ट्रॅक जॅम झाला. ज्या ट्रॅकवर ही ट्रेन बंद पडली. त्या ट्रॅकवरून मुंबईकडून हावड्याला जाणा-या ट्रेनची वाहतूक होत असते. त्यामुळे ही बंद पडलेली ट्रेन बाजूला करणे आवश्यक बनले.

दरम्यान, बिघाड झालेल्या ट्रेनला बाजूला करण्यासाठी दुसरी ट्रेन येईंपर्यंत खूप उशीर झाला असता. त्यामुळे दुसरी ट्रेन येण्याची वाट न पाहता रेल्वेच्या अधिका-यांनी जवळूनच मजूर बोलावण्याचा निर्णय घेतला. या मजुरांनी धक्के मारून ट्रेनला मेन लाईनवरून बाजूला केले. बिघाड झालेल्या ट्रेनला मेन लाईनवरून लूप लाईनवर आणण्यात आले. दरम्यान मजूर ट्रेनला मेन लाईनवरून हटवत असताना कुणीतरी व्हीडीओ तयार केला.

Leave a Reply

Your email address will not be published.

20 + 4 =

Close