घरगुती सिलिंडर ग्राहकांची निराशा

Read Time:3 Minute, 24 Second

नवी दिल्ली : छोटे व्यावसायिक आणि वाणिज्य ग्राहकांना आज पेट्रोलियम कंपन्यांनी दिलासा दिला. आजपासून १९ किलोग्रॅमच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत १०० ते १२२ रुपयांची कपात करण्यात आली आहे. घरगुती वापराच्या १४.२ किलोग्रॅम एलपीजी गॅस सिलिंडरचे दर मात्र जैसे थेच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे व्यासायिकांना दिलासा मिळाला असला तरी कोट्यवधी घरगुती ग्राहकांसाठी एलपीजी सिलिंडरचा भाव मे महिन्याप्रमाणेच आहे.

देशभरातील गॅस सिलिंडरच्या किमतीत १ जून २०२१ पासून बदल झाला आहे. त्यानुसार सलग दुस-या महिन्यात पेट्रोलियम कंपन्यांनी वाणिज्य वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे. आज कंपन्यांनी १९ किलोग्रॅमच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १२२ रुपयांची कपात केली. त्यानुसार १९ किलोग्रॅमच्या एलपीजी सिलिंडरचा भाव १४७०.५० रुपये झाला आहे. त्याआधी तो १५९५.५० रुपये होता. मे महिन्यात कंपन्यांनी याच सिलिंडरचा भाव ४५ रुपयांनी कमी केला होता. आजच्या दर कपातीनंतर मुंबईत १९ किलोग्रॅमच्या एलपीजी सिलिंडरचा भाव १४२२.५० रुपये झाला आहे. दिल्लीत या सिलिंडरसाठी ग्राहकांना १४७३.५० रुपये मोजावे लागतील. कोलकात्यात तो १५४४.५० रुपये झाला आहे, तर चेन्नईत १६०३ रुपयांना १९ किलोग्रॅमच्या एलपीजी सिलिंडर मिळेल.

इंधन दरवाढ सुरूच
दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सपाटा सुरूच आहे. तेल कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोल दरात २७ पैसे तर डिझेलमध्ये २३ पैसे वाढ केली. या दरवाढीने मुंबईत पेट्रोलचा भाव १००.७२ रुपये झाला आहे. काल सोमवारी पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रत्येकी २९ पैशांची वाढ केली होती, तर रविवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. मात्र शनिवारी पेट्रोल २८ पैसे आणि डिझेल २६ पैशांनी महागले होते. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत एक लिटर पेट्रोलचा भाव १००.७२ रुपये झाला आहे. आज दिल्लीत पेट्रोल ९४.४९ रुपये झाले आहे. चेन्नईत एक लिटर पेट्रोलचा भाव ९५.९९ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९४.५० रुपये झाला आहे, तर मुंबईत एक लिटर डिझेलचा भाव ९२.६९ रुपये आहे. दिल्लीत ८५.३८, चेन्नईत ९०.१२ रुपये, कोलकात्यात ८८.२३ रुपये प्रतिलिटर दर झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

fourteen + 4 =