August 19, 2022

घंटा वाजणार!

Read Time:3 Minute, 54 Second

मुंबई : कोरोना काळात राज्यातील शाळा पूर्णपणे बंद असल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय अवलंबावा लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच बोर्डांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, एकीकडे कोरोनाचे प्रमाण काहीसे नियंत्रणात येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा शाळा सुरू करण्याचा निर्णय येत्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.

१७ ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा आम्ही विचार करत आहोत. त्यासंदर्भात कमिटीने सर्व एसओपी निश्चित केल्यानंतर त्याची माहिती दिली जाईल, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. आतापर्यंत कोरोना रुग्णसंख्या मर्यादित असलेल्या ग्रामीण भागातच शाळा सुरू असताना शहरी भागातही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

राज्यात सध्या कोरोनासंदर्भातील निर्बंध लागू आहेत. कोरोनाच्या स्थानिक परिस्थितीनुसार कोरोनाचे निर्बंधदेखील काही ठिकाणी शिथिल तर काही ठिकाणी कठोर अशा स्वरूपाचे आहेत. कोरोना रुग्णसंख्या कमी झालेल्या राज्याच्या ग्रामीण भागात आधीच शाळा सुरू करण्याची मुभा राज्य सरकारने दिली असून त्यासाठी कोरोनाची रुग्णसंख्या आणि इतर अटी घालून दिल्या आहेत. आता त्यामध्ये अधिकच्या वर्गांचा समावेश केला जाणार आहे.

ग्रामीण भागाप्रमाणे सूट मिळणार
सध्या राज्यात ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी आहे, त्या ग्रामीण भागात ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. आता त्यामध्ये शहरी भागाचादेखील समावेश करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

५ वी ते ८ वीपर्यंत वर्ग सुरू करणार
येत्या १७ ऑगस्टपासून राज्यातल्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत. रुग्णसंख्या कमी झाली आहे, अशा ठिकाणी ग्रामीण भागात ५वी ते ८ वीच्या शाळा सुरू करण्याचा विचार आहे. त्यासोबतच शहरी भागात महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायत क्षेत्रातील ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या समितीप्रमाणेच शहरी भागांसाठीही समितीची नियुक्ती करण्यात येईल, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

4 × one =

Close