ग्रामीण भागात घरोघरी कोरोना टेस्ट कराव्यात; लसीकरणाचा वेगही वाढवा : मोदी

Read Time:3 Minute, 22 Second

नवी दिल्ली : देशात दुस-या लाटेत शहरांसोबत ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे शहरांबरोबरच ग्रामीण भागात घरोघरी कोरोनाच्या चाचण्या केल्या जाव्यात. तसेच लसीकरणाचा वेगही वाढवावा, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोरोनाच्या स्थितीसोबतच लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मंत्रालयातील मंत्री आणि अधिकारी यांचा सहभाग होता. ग्रामीण भागात कोरोनाचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे घरोघरी टेस्ट झाल्या पाहिजेत आणि वेळीच तशी दक्षताही घेतली पाहिजे. विशेष म्हणजे उच्च संक्रमित क्षेत्रात अधिकाधिक टेस्टिंगची आवश्यकता असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्याचे अधिका-यांनी सांगितले. या व्यतिरिक्त रुग्णांची संख्या आणि कोरोनावर मात करणा-या रुग्णांची माहितीही देण्यात आली. ग्रामीण भागात ऑक्सिजन पुरवण्याची योजना आखण्यास पंतप्रधान मोदी यांनी सूचना दिल्या आहेत. तसेच अधिका-यांना लसीकरण वेगाने करण्यासह राज्यांसोबत एकत्र काम करण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्राने राज्यांना दिलेल्या व्हेंटिलेटरचे ऑडिट करा
आढावा बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्राकडून राज्यांना देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरबाबतचे प्रश्न गंभीरतेने घेतले आहेत. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत याबाबत ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. अनेक ठिकाणी व्हेंटिलेटरचा वापर केला जात नसल्याचे समोर आले. तसेच काही ठिकाणी हे व्हेंटिलेटर दर्जेदार नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गरज पडल्यास आरोग्य कर्मचा-यांना व्हेंटिलेटर वापरण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. हे व्हेंटिलेटर्स पीएम केअर्स फंडातून देण्यात आले आहेत. यासंबंधी राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र आणि गुजरातमधून तक्रारी आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

three × 1 =