
गौरवास्पद; बायोलॉजिकल ई ठरणार जगातील सर्वात स्वस्त लस
नवी दिल्ली : बायोलॉजिकल ई या कंपनीची कोरोना लस देशातील दुसरी मेड इन इंडिया कोरोना लस ठरत असून, सदर लस जगातील सर्वात स्वस्त लस ठरण्याचे संकेत मिळाले आहे़ यामुळे देशात शिरपेचात आणखी एक सन्मानाचा तुरा रोवल्या जाणार आहे़ या कोविड १९ लसीच्या ३० कोटी डोसची आगाऊ खरेदी केंद्र सरकारकडून केली जात असून, यासाठी बायोलॉजिकल ई या कंपनीला १५०० कोटी रुपये आगाऊ देण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे़आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, लसीचे हे सर्व डोस ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ दरम्यान साठवले जाणार आहे.
हैदराबादस्थित लस निर्मात्या बायोलॉजिकल ई या कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या लसीच्या पहिल्या आणि दुस-या टप्प्यातील परीक्षणात चांगले परिणाम पाहायला मिळाले. या लसींची तिस-या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. आगाऊ लस उत्पादनाचा प्रस्ताव लस पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नॅशनल एक्सपर्ट ग्रुपनेही पडताळून पाहिला आहे. कंपनीला २४ एप्रिल रोजी फेज ३ ट्रायलसाठी परवानगी मिळाली होती. नोव्हेंबर २०२० मध्ये या लसीची पहिल्या आणि दुस-या टप्प्यातील चाचणीची सुरूवात झाली होती. फेज ३ ट्रायलमध्ये देशातील १५ निरनिराळ्या ठिकाणांवर १२६८ उमेदवार सहभागी होणार आहेत.
लस निर्मितीसाठी भारत सरकारची आर्थिक मदत
बायोलॉजिकल ई च्या लस निर्मिता प्रक्रियेदरम्यान प्री-क्लिनिकल स्टेजपासून ते फेज ३ पर्यंतच्या अभ्यासात भारत सरकारने मदत केली आहे. यासाठी बायोलॉजिकल ई कडून १०० कोटींहून अधिक आर्थिक मदत उभी केली. बायोलॉजिकल ई द्वारे निर्माण करण्यात येत असलेली ही लस एक आरबीडी प्रोटीन सब-युनिट लस आहे. येत्या काही महिन्यांत ही लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ही लसदेखील दोन डोसमध्ये उपलब्ध होणार आहे. पहिल्या डोसनंतर २८ दिवसांनंतर दुसरा डोस देण्यात येईल.
जगातील सर्वात स्वस्त लस ठरणार?
३० कोटी डोससाठी केंद्र सरकारकडून कंपनीला आगाऊ १५०० कोटी रुपये मिळणार आहेत. याचाच अर्थ एका डोससाठी ५० रुपये… या लसीचीकिंमत अद्याप निश्चित झाली नसली तर ही लस जगातील सर्वात स्वस्त करोना लस ठरू शकते. एका रिपोर्टनुसार, या लसीचीकिंमत १.५ डॉलर म्हणजेच जवळपास ११० रुपये प्रति डोस असू शकते.
देशात तीन लशींच्या वापराला परवानगी
देशात आतापर्यंत सीरम इन्स्टिटयूटची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन तसेच, रशियानिर्मित स्पुतनिक व्ही या तीन कोविड लसींना आपात्कालीन वापराची परवानगी देण्यात आली आहे़ यातील कोविशिल्ड सर्वात स्वस्त लस असली तरी ही लस ऑक्सफर्ड – अॅस्ट्रेजेनेका शास्त्रज्ञांनी तयार केली आहे. या लसीचे उत्पादन सीरम इन्स्टिटयूटकडून सुरू आहे.