January 21, 2022

गोदामाय कोपली

Read Time:3 Minute, 37 Second

औरंगाबाद/बीड : पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढल्याने पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पातून दि. २९ सप्टेंबर रोजी रात्री ११:३० वाजता सर्वच्या सर्व २७ वक्र दरवाजे उघडण्यात आले. यामुळे गोदावरीच्या पात्रात पाणी पाणीच झाले असून नदीकाठांवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. तसेच अनेक गावांना पाण्याने वेढा दिला आहे. काही ठिकाणी अडकलेल्या ग्रामस्थांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे पथक सज्ज ठेवण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यातही गेवराई तालुक्यात ७ गावांना पाण्याने वेढा दिला आहे. त्यामुळे गोदामाय कोपल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, नांदेड, परभणी जिल्ह्यातील प्रशासनानेही पुराचा सामना करण्याची तयारी केली आहे.

जायकवाडी धरणात ९८.६२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या वाढत्या पाणी परिस्थितीवर धरण व तालुका प्रशासनाने कडक नियंत्रण ठेवले आहे. धरणाची एकूण पाणीपातळी १५२२ फूट असून, सध्या ही पाणी पातळी १५२१.७५ फूट झाली आहे. धरण निर्मितीच्या काळापासून नाथसागर २२ वेळा भरले असून, या काळात अनेक वेळा महापुराच्या परिस्थितीला पैठणकरांना तोंड द्यावे लागले होते. जायकवाडीचे सर्वच दरवाजे उघडल्याने आता गोदावरी नदी तुडुंब भरून वाहात असून, पुढे माजलगाव धरणाचे दरवाजेही उघडण्यात आले आहेत. मात्र, बीड जिल्ह्यात ब-याच गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे.
नांदेड, परभणी जिल्ह्यातही गोदावरीच्या पाण्याचा ओघ वाढणार असल्याने दोन्ही जिल्ह्यांत प्रशासन सतर्क आहे. मात्र, पाण्याचा फ्लो वाढत राहिल्यास नदीकाठावरील गावांना धोका आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अगोदरच सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे अगोदरच सर्व प्रकल्प तुडुंब भरलेले आहेत. त्यात जायकवाडीचे सर्वच दरवाजे उघडल्याने पुन्हा पुराचा धोका वाढणार आहे.

विष्णुपुरीतून विसर्ग सुरूच
जायकवाडीचे पाणी शुक्रवारी सकाळपर्यंत विष्णुपुरीत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे विष्णुपुरी धरणाचे १५ दरवाजे उघडलेलेच असून, यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहात आहे. लातूर, उस्मानाबादमध्ये मांजरा, तेरणाची पूरस्थिती कायम आहे. मात्र, पावसाची उघडीप असल्याने स्थिती काही अंशी नियंत्रणात असल्याने तूर्त तरी दिलासा मिळालेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17 + 6 =

Close