गॅस सिलिंडरच्या किमती आणखी वाढणार?

Read Time:4 Minute, 18 Second

गगनाला भिडले दर, १ सप्टेंबरला आढावा, ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता कमीच

नवी दिल्ली : जीवनोपयोगी वस्तूंच्या दरांत सातत्याने बदल होत असतात. इंधनाच्या बाबतीतही तेच घडते. दर महिन्याच्या सुरुवातीला इंधन कंपन्या उत्पादनांचे नवीन दर जाहीर करत असतात. ऑगस्ट महिन्याच्या १ तारखेला तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत (१९ किलो) ३६ रुपयांनी कमी केली. याचा थेट फायदा सिलेंडर वापरकर्त्यांना झाला. आता सप्टेंबरच्या १ तारखेला एलपीजी सीएनजीच्या दरात होणा-या जाहीर बदलाकडे सामान्यांसह सगळ््यांचे लक्ष आहे. मागच्या दोन महिन्यांत दरात कुठलीही वाढ नाही. अशा स्थितीत सिलिंडरचे दर वाढण्याचीच शक्यता अधिक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

एलपीजीची किंमत कच्च्या तेलाच्या किंमतीसह इतर अनेक घटकांवर अवलंबून असते. सीएनजीचीही तीच स्थिती आहे. सीएनजीच्या प्रचंड वाढीमुळे वाहनचालकांचे बजेट ढासळले. किमती इतक्या वाढल्या की, टॅक्सी सेवांना त्यांचे किमान भाडे वाढवावे लागले आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या रोज खर्चावरही झाला. दिल्लीत सध्या प्रतिकिलो सीएनजीची किंमत ७५.६१ रुपये (आयजीएल), रुपये ८० (एमजीएल) आणि ८३.९ रुपये (अदानी गॅस) आहे. त्यामुळे वाहनधारकांचेही कंबरडे मोडले आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीवर एलपीजी आणि सीएनजीच्या किमती अवलंबून असतात. दरम्यान, ब्रेंट क्रूडच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाली असून सध्या ते प्रतिबॅरल ९९.८० डॉलरवर पोहोचले आहे. यावरून तेल विपणन कंपन्यांकडून दर कमी होण्याची शक्यता दिसत नाही. उलट दरवाढीची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु अगोदरच गॅस सिलिंडरचे दर गगनला भिडलेले आहेत. त्यात आता दरवाढ केल्यास ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होऊ शकतो. याचाही विचार होऊ शकतो. मात्र, कच्च्या तेलाच्या किमतीत काही अंशी वाढ झाल्याने तेल कंपन्या गॅस सिलिंडरच्या दरात काही अंशी वाढ करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दोन महिन्यांत बदल नाही
गेल्या दोन महिन्यांपासून एलपीजीच्या दरात फार मोठा बदल झालेला नाही. त्यामुळे दरवाढीची शक्यता अधिक आहे. सीएनजीबाबत सांगायचे झाल्यास गेल्या काही महिन्यांपासून सीएनजीच्या किमतीत सतत वाढ झाली आहे. त्यामुळे याच्या दरात घट होण्याची शक्यता फार कमी असून सीएनजीचे दर याच पातळीवर राहण्याची शक्यता आहे.

कसे ठरवले जातात दर?
एलपीजीची किंमत ठरवण्यासाठी मूल्यांकन केले जाते. एलपीजीची किंमत ठरवण्यासाठी आयात समता मूल्य सूत्र वापरले जाते. यामध्ये कच्च्या तेलाची किंमत, सागरी मालवाहतूक, विमा, कस्टम ड्युटी, बंदर खर्च, डॉलर ते रुपया विनिमय, मालवाहतूक, तेल कंपनी मार्जिन, बॉटलिंग खर्च, विपणन खर्च, डीलर कमिशन आणि जीएसटी यांचा समावेश असतो. तर सीएनजी कच्च्या तेलापासून नाही तर नैसर्गिक वायूपासून बनते. त्यामुळे याचा थेट परिणाम सीएनजीच्या दरांवर होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

sixteen − 7 =