January 21, 2022

गायिका स्वप्नाली गायकवाडचा दिदींना अनोखा नजराणा

Read Time:3 Minute, 31 Second

लातूर : गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त लातूरच्या गायिका स्वप्नाली गायकवाडने सलग ९२ गाणी गाऊन विश्वविक्रमी नजराना सादर केला. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सांस्कृतिक क्षेत्रात कौतुक होत आहे.

कलेच्या सेवे सारखी दुसरी सेवा नाही आणि संगीत साधने सारखी दुसरी साधना नाही. अशाच या संगीत क्षेत्रातील साक्षात सरस्वती म्हणजेच भारतरत्न ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त लातूरची गायिका स्वप्नाली गायकवाडने या गानसम्राज्ञीला एक अनोखा नजराणा दिला आहे.

स्वप्नाली गायकवाड संगीताची निस्सिम साधक आहे आणि दिदी तिच्यासाठी आदर्श आहेत. याच साधनेच्या आधारे तिने लता दिदींना भेट दिली आहे. स्वप्नालीने लता दिदींच्या ९२ व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आजवर गायलेली ९२ गाणी अवघ्या ४ तासांत सलग गाऊन अजाणतेपणी विश्वविक्रम केला आहे. या विक्रमाची नोंद हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. या ९२ गाण्यांमध्ये लग जा गले, होठों पे ऐसी बात, जाने क्या बात है या आणि अशा अनेक अजरामर गीतांचा समावेश आहे. यासाठी स्वप्नाली गेल्या ३ महिन्यांपासून अथक सराव करत होती आणि तिच्या या अथक प्रयत्ना ंमधून तिने हे आगळे-वेगळे स्वप्न साकार केले आहे.

स्वप्नाली गायकवाड ही मूळची लातूरची असून ती ४ वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहे. ती पं. उपेंद्र भट्ट (पं. भिमसेन जोशींचे परम शिष्य) यांची शिष्य आहे. याचसोबत तिने पुण्याच्या एम. आय. टी. विश्वशांती संगीत कला अकादमीमधून देखील संगीताचे शिक्षण घेतले आहे. ती कायमच भारतरत्न लता मंगेशकर यांच्या कलेने प्रभावित होती आणि त्यांचे भाचे आदिनाथ मंगेशकर यांच्याकडून संगीताचे धडे गिरवताना स्वप्नालीला हे सारं अधिकच जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. स्वप्नालीची ही भेट आदिनाथ मंगेशकरांसाठी आश्चर्याचा एक सुखद धक्काच होती आणि त्यांनी त्यासाठी तिचे खूप कौतुकही केले.

स्वप्नाली गायकवाडच्या या अथक प्रयत्नांना, तिला सहाय्य करणा-या सगळ्यांच्या प्रयत्नांना या विश्वविक्रमासोबत यश आलं आहे. आपल्या आदर्शस्थानी असलेल्या गानसम्राज्ञीला स्वप्नालीने दिलेल्या या विलक्षण नजराण्याने अनेकांचे लक्ष वेधले व स्वप्नालीला अनेकांकडून कौतुकाची थाप मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × 4 =

Close