
गरिबांना लुटणे व उद्योगती मित्रांचे खिसे भरणे हाच मोदींचा एक कलमी कार्यक्रम !
मुंबई दि. १० (प्रतिनिधी) केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून गरिबांना लुटायचे आणि उद्योगमंत्री खिसे भरायचे हाच एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. याचाच परिणाम म्हणून देशात इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. एकाबाजूला दरवाढ, महागाई आणि दुस-या बाजूला प्रचंड प्रमाणात वाढलेली बेरोजगारी व केंद्राचे शेतकरी विरोधी धोरण यामुळे गरीब, शेतकरी व सर्वसामान्यांचे जगणे कठिण झाले आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने १४ ते १९ नोव्हेंबरपर्यंत जनजागरण सप्ताह अभियान व जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिली.
गांधी भवन येथे पत्रकारपरिषदेत बोलताना पटोले म्हणाले की, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सातत्याने इंधनाचे दर आणि महागाई वाढवून देशातील गरीब मध्यमवर्गीय जनतेची लूट करत आहे. गेल्या एका वर्षात खाद्य तेलाच्याकिंमती दुप्पट वाढल्या आहेत. इंधनाच्याकिंमतीत एका वर्षात प्रति लिटर जवळपास ३५ रूपयांची वाढ सरकारने केली आहे. युपीए सरकारच्या काळात ४४० रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर आता ९५० रुपये झाला आहे. उज्वला गॅस योजनेच्या नावाखाली गरिबांचे केरोसिन बंद केले आणि आता गॅस ९५० रुपयांपर्यंत महाग केला. गेल्या ८ महिन्यात केंद्र सरकारने जवळपास ७५ वेळा इंधन दरवाढ केली. मोदी सरकारने सात वर्षात तब्बल २५ लाख कोटी रुपयांची नफेखारी करून जनतेचे आर्थिक शोषण केले आहे. मोदी सरकारच्या या लोकविरोधी धोरणाबाबत जनजागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिनापासून म्हणजेच १४ ते १९ नोव्हेंबरपर्यंत जनजागरण अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियाना अंतर्गत काँग्रेस पक्षाचे नेते, मंत्री, आमदार, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी कार्यकर्ते प्रत्येक शहरात आणि गाव खेड्यात लोकांच्या घरी जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गावात मुक्काम करून लोकांशी संवाद साधतील. केंद्र सरकारने इंधनदरवाढ करून महागाई कशी वाढवली आहे याची माहिती लोकांना देतील, असे पटोले यांनी सांगितले.
पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि एक मंत्री यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा सामना चाललेला आहे. दोन्ही नेते जबाबदार पदावर आहेत. त्यांनी एकमेकांवर अंडरवर्ल्ड, दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप केले आहेत. यातून महाराष्ट्राची बदनामी सुरु आहे. त्यांनी आपल्या आरोपांचे पुरावे द्यावेत. काँग्रेस पक्षासाठी इंधन दरवाढ, वाढती महागाई , बेरोजगारी, शेतक-यांचे प्रश्न हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. आम्ही हे मुद्दे घेऊन आम्ही जनतेमध्ये जाऊन जनजागृती करून केंद्रातील मोदी सरकारविरोधात आंदोलन करणार आहोत, असे पटोले यांनी सांगितले.
एसटी कर्मचा-यांचा संप सामोपचाराने मिटला पाहिजे. सणासुदीचे दिवस आहेत सर्वसामान्य जनतेला संपाचा त्रास होऊ नये ही सुरुवातीपासून काँग्रेस पक्षाची भूमिका राहिली आहे. सरकारने एसटी कर्मचा-यांच्या महागाई भत्ता, पगार यात वाढ करून त्यांच्या मागण्याही मान्य केल्या आहेत. पण भाजप नेते एस टी कर्मचा-यांची दिशाभूल करत आहेत. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी कर्मचा-यांचा वापर करत आहे असा आरोप पटोले यांनी केला.