खून प्रकरणातील आठ गुन्हेगारांना अटक

Read Time:4 Minute, 49 Second

नांदेड : आठवड्यापूर्वी इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गाडीपुरा भागात झालेल्या विकी ठाकुरच्या खुन प्रकरणातील मुख्य आरोपी लक्की मोरे व नितीन बिगानिया यासह आठ गुन्हेगारांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पकडलेल्या आठही गुन्हेगारांवर विविध पोलिस ठाण्यात इतरही गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती बुधवारी पोलिस मुख्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी दिली.

२० जुलै रोजी विक्की ठाकूर याचा खून करणा-या आठ मारेक-यांना पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांच्या कुशल नेतृत्वात नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने अवघ्या ७ व्या दिवशी गजाआड केले आहे. पकडलेल्या अनेक जणांवर या पूर्वी सुद्धा खून, दरोडे असे गुन्हे नोंदवलेले आहेत. बुधवार दिनांक २८ जुलै रोजी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हि माहिती देण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस उप अधीक्षक डॉ.सिद्धेश्वर भोरे, आदी उपस्थित होते.

नांदेडच्या गाडीपुरा भागात दि. २० जुलै रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास विक्की दशरथसिंह ठाकूर (३२) या युवकावर वेषांतर करून आलेल्या नितनी बनिया व त्याचे साथीदारांनी हल्ला केला. त्यात विक्की ठाकूरच्या डोक्यात गोळी मारून त्याच्या शरीरावर अनेक जखमा तलवारीने करण्यात आल्या. त्यावेळी सुरज भगवान खिराडे आणि निखिल उर्फ कालु मदने सुद्धा विक्की ठाकूर सोबत होते. इतवारा पोलीस ठाण्यात सुरज खिराडेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्याचा तपास इतवाराचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्याकडे देण्यात आला.

या तक्रारीतील मारेकरी यादीत असणा-या दोन आरोपी महिलांना प्रथम अटक झाली. त्यांना पोलीस कोठडी आणि चार दिवसांनी न्यायालयीन कोठडी मिळाली. या गुन्ह्याच्या तपासात असलेले गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्यावर मारेक-यांना शोधण्याची जबाबदारी दिली.त्यानुसार द्वारकादास चिखलीकर त्याचे सहकारी आदींनी स्थानिक पोलिसांची मदत घेत नितीन जगदीश बिघानिया (३३), लक्ष्मण उर्फ लक्की बालाजी मोरे पाटील (२३), दिगंबर उर्फ डीग्या टोपाजी काकडे(२७), मुंजाजी उर्फ जब्या बालाजी धोंडगे (२०), सोमेश सुरेश कत्ते (२२), मयुरेश सुरेश कत्ते (२०), कृष्णा उर्फ गब्या छगनसिंह परदेशी (२०), तानाजी शंकर चव्हाण (३१) या अरोपीुना पकडले.सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे , अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, अपर पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे द्वारकादास चिखलीकर त्याचे सहकारी सहायक पोलीस निरीक्षक संकेत दिघे, सपोनि पांडुरंग भारती, संजय केंद्रे , बालाजी तेलंग, तानाजी येळगे, बालाजी यादगीरवाड,मोतीराम पवार, महेश बडगू,राजू पुल्लेवार, बालाजी मुंडे आदींनी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen − 13 =