खुनाच्या चित्तथरारक घटनेचा उलगडा

Read Time:3 Minute, 56 Second

लातूर : प्रतिनिधी
येथील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लातूर तालुक्यातील भुईसमुद्रगा येथे दि. १९ डिसेंबर २०२१ रोजी खुनाची चित्तथरारक घटना घडली होती. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करुन बारकाईने तपास केला असता या घटनेचा उलगडा झाला आहे. मटनाच्या जेवणानंतर डोक्यात शेती औजाराने जबर मारुन बेशुद्ध अवस्थेत बाजेवर झोपवले व पेट्रोल टाकुन पेटवून दिल्याची कबुली आरोपीने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी सांगीतले की, भुईसमुद्रगा येथील ऋषिकेश रामकिशन पवार वय २९ रा. भुईसमुद्रगा हा त्याच्या शेतातील आखाड्यामध्ये जळुन मयत झाल्याच्या माहितीवरुन एमआयडसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान घटनास्थळास अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी भेट दिली.

घटनास्थळावर तपाससाच्या दृष्टीने वरिष्ठांनी मार्गदर्शक सूचना दिल्या. त्यानूसार पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस उपनिरीक्षक संदीप कराड, पोलीस नाईक दरेकर, पोलीस नाईक वायगावकर, पोलीस नाईक मालवदे यांनी अकस्मात मृत्यूचा तपास सुरु केला. मयत हा घटनेच्या दिवशी कोणासोबत होता. या दृष्टीने बारकाईने तपास केला. दि. १९ डिसेंबर रोजी मयत ऋषिकेश पवार याच्या शेतातील आखाड्यावर त्याच्या गावातील त्याचा मेहुणा रणजीत विजयकुमार देशमुख व चुलत भाऊ गोविंद नागोराव पवार हे दारु पिऊन मटनाचे जेवण केल्यानंतर आरोपी गोविंद पवार याने मयत ऋषिकेश पवार या तु लई माजलास का? तु माझ्या भावजयीला मोबाईलवर का बोलतोस, असे म्हणून वादावादी करुन आरोपी गोविंद पवार याने दाताळाने (शेती औजार) मयताच्या डोक्यात मारले. मयत ऋषिकेश पवार हा बेशुद्ध पडल्यानंतर त्यास गोविंद पवार व रणजित देशमुख यांनी बाजेवर झोपवून त्याच्यावर पेट्रोल टाकुन पेटवून दिले व पायी घराकडे गेले. सदर गुन्ह्याची कबुली आरोपींनी दिलेली आहे.

या अकस्मात मृत्युचा तपास पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस उपनिरीक्षक संदीप कराड, पोलीस हेड कॉन्स्टेबल बेल्लाळे, पोलीस नाईक राजपूत, पोलीस नाईक ओगले, पोलीस नाईक दरेकर, पोलीस नाईक वायगावकर, पोलीस नाईक मालवदे, पोलीस शिपाई जाधव यांनी गुप्त माहिती काढून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

four × 2 =