खासदारांना मोदी कानमंत्र देणार

Read Time:2 Minute, 39 Second

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना भाजपचे शत प्रतिशत व अचूक मतदान व्हावे यासाठी भाजप नेतृत्वाने कंबर कसली आहे. दि. १८ जुलै रोजी राष्ट्रपती निवडणूक आणि अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी भाजपच्या सर्व खासदारांना शनिवार दि. १६ जुलै रोजी कानमंत्र देणार आहेत.

भाजपच्या लोकसभा-राज्यसभा खासदारांसाठी दिल्लीत ‘डिनर’ आयोजित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणा-या या मेजवानीच्या निमित्ताने दोन्ही सदनांतील भाजप खासदारांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान कसे करावे याबाबत विस्ताराने मार्गदर्शन व प्रात्यक्षिक देण्यात येईल. ही निवडणूक व आगामी संसदीय अधिवेशन याबाबत स्वत: मोदी यांचे संबोधन हा या बैठकीच्या उत्सुकतेचा विषय आहे.

राष्ट्रपतीपदासाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीसह राज्यांत व केंद्रशासित प्रदेशांत मतदान होणार आहे. भाजपने उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांचे नाव जाहीर करताच चित्र बदलल्याने श्रीमती मुर्मू यांचा विजय दृष्टीपथात आला असल्याचे चित्र आहे. मुर्मू यांच्या देशव्यापी दौ-याच्या प्रत्येक टप्प्यागणिक राज्याराज्यांतून त्यांनावाढता पाठिंबा मिळत असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. मात्र भाजपचे सर्वेसर्वा नेतृत्वाची कोणतीही रिस्क घेण्याची तयारी नाही. त्यादृष्टीने देशभरातील भाजप आमदार, खासदारंसाठी निवडणुकीच्या मतदानाबाबत असेच प्रशिक्षण वर्ग घेण्याच्या सूचना भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

6 + 1 =