July 1, 2022

क्रूझ ड्रग पार्टीत भाजप नेत्यांच्या नातेवाईकालाही पकडले होते, पण दबावामुळे सोडले; एनसीबीने आरोप फेटाळले

Read Time:6 Minute, 27 Second

मुंबई,दि.९(प्रतिनिधी) कॉर्डिलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर धाड घातल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) ११ जणांना ताब्यात घेतले होते. त्यातील भाजपाच्या एका नेत्यांचा मेहुण्यासह तिघांना भाजपच्या दिल्ली आणि महाराष्ट्रातील नेत्यांनी फोन केल्यानंतर सोडण्यात आले. आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज केला. या कारवाईचे व्हिडिओच मलिक यांनी प्रसिद्ध केल्याने एनसीबीच्या कारवाईवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान एनसीबीने १४ जणांना ताब्यात घेतले होते, परंतु चौकशीत काहीही न आढळल्याने सहा जणांना सोडण्यात आल्याचे मान्य करताना, मलिक यांचे आरोप मात्र फेटाळून लावले.

गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापा मारून एनसीबीने सुपरस्टार शाहरूख खान याचा मुलगा आर्यनसह आठ जणांना अंमली पदार्थ बाळगल्याबद्दल अटक केली आहे. या कारवाई दरम्यान एनसीबीच्या पथकाबरोबर भाजपाचे पदाधिकारीही सहभागी होते असा गौप्यस्फोट करून नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली होती. यानंतर एनसीबीने त्या दोघांना साक्षीदार म्हणून बोलावले होते अशी सारवासारव केली. मात्र साक्षीदारांना आरोपींना पकडून नेण्याचेही काम दिले होते का ? यावर काहीही सांगता आले नव्हते. त्यातच आज नवाब मलिक यांनी आणखी एक गौप्यस्फोट करून पुन्हा एकदा एनसीबीला टार्गेट केले.

एनसीबीने क्रूझवर धाड घातल्यानंतर सुरूवातीला ८ ते १० जणांना ताब्यात घेतल्याचा दावा केला होता. पण प्रत्यक्षात याठिकाणी ११ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यापैकी तिघांना भाजपच्या दिल्ली आणि महाराष्ट्रातील नेत्यांनी फोन केल्याने सोडण्यात आले. सोडण्यात आलेल्यांपैकी रिषभ सचदेवा हा भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज उर्फ मोहित भारतीय यांचा मेहुणा असल्याचा गंभीर आरोप नबाव मलिक यांनी केला.

हे सगळे प्रकरण संशयास्पद असून खोटी छापेमारी करून महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कारस्थान एनसीबीच्या माध्यमातून करण्यात आल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. रिषभ सचदेवाला सोडले तेव्हा त्याचे वडिल आणि काका दोघेही त्याठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या फोनवरून भाजप नेत्यांनी दिल्लीतून आणि महाराष्ट्रातील नेत्यांना फोन केले गेले. त्यांच्या तसेच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या कॉल रेकॉर्डची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

एनसीबीने आरोप फेटाळले
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. एनसीबीने क्रूझवरून एकूण १४ लोकांना ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर ६ जणांना सोडून देण्यात आले. गरज पडल्यास त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले. एनसीबीच्या कारवाई दरम्यान स्वतंत्र सार्वजनिक साक्षीदारांची आवश्यकता असते. त्यावेळी साक्षीदारांची पार्श्वभूमी तपासण्यासाठी आमच्याकडे वेळ नसतो. या प्रकरणात ९ स्वतंत्र साक्षीदार आहेत. आम्ही त्यांना आधी ओळखत नव्हतो. जी काही कारवाई केली ती नियमानुसारच असल्याचे ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले.

नवाब मलिक यांच्याविरोधात १०० कोटींचा खटला -मोहित कंबोज
नवाब मलिक यांनी केलेले आरोप मोहित कंबोज यांनी फेटाळून लावले असून, नवाब मलिक यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले. नवाब मलिक यांचे सर्व आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत. ऋषभ सचदेव हा माझा मेव्हणा आहे व ज्यावेळी एनसीबीने क्रुजवर कारवाई केली त्यावेळी तो बोटीवर होता. मात्र अभिनेते शाहरुख खाना यांना मुलगा आर्यन खान यांचा आणि वृषभ सचदेव याचा काहीही संबंध नाही, असे मोहित कंबोज यांनी सांगितलं. ऋषभला कुठलेही व्यसन नाही. मलिक यांनी आरोप सिद्ध करावे अन्यथा मी त्यांच्या विरोधात १०० कोटींचा दावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कंबोज हे मुंबई भाजपचे मुंबई माजी सरचिटणीस आहेत. २०१६ ते २०१९ या काळात भाजपा युवा मोर्चाचे मुंबईचे अध्यक्ष होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

2 × 5 =

Close