कोळसा टंचाई प्रकरणात अमित शहांनी घातले लक्ष

Read Time:1 Minute, 59 Second

नवी दिल्ली : देशात निर्माण झालेल्या कोळसा संकट प्रकरणात गृहमंत्री अमित शहा यांनी लक्ष घातले आहे. त्यांनी आज या प्रकरणात केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी आणि ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांना चर्चेसाठी पाचारण करून त्यांच्याकडून या विषयाचा आढावा घेतला. तीन मंत्र्यांमधील ही बैठक सुमारे तीन तास चालली.

देशातील वीजनिर्मिती प्रकल्पांना तातडीने कोळसा पुरवठा कसा करता येईल, यावर यावेळी चर्चा झाली. या बैठकीला कोळसा व वीज मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

सध्या दिल्लीसह गुजरात, पंजाब, राजस्थान व तामिळनाडू या राज्यांमध्ये तीव्र वीज संकट निर्माण झाले आहे. त्या राज्यांमध्ये वीज कंपन्यांना केवळ काही दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा शिल्लक राहिला आहे. देशाच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने खाणीतून वीज प्रकल्पांपर्यंत कोळसा वाहून नेण्याच्या कार्यात विलंब लागत असल्याने ही कोळसा टंचाई निर्माण झाली आहे.

तथापि, ७ ऑक्­टोबर रोजी कोल इंडियाच्या खाणीतून १.५०१ मेट्रिक टन कोळशाचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यातील तफावत ब-यापैकी कमी झाली आहे, असे ऊर्जा मंत्रालयाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

2 + 4 =