January 21, 2022

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांना ५० हजार देणार

Read Time:4 Minute, 17 Second

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दि. ४ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोविड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांस ५० हजार रुपये सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. याबाबतचा शासन आदेश (जी आर) आज जारी करण्यात आला आहे.

राज्य शासनाने मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होण्याकरिता ही योजना तयार केली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती कोविड १९ या आजारामुळे निधन पावली आहे, तसेच जर त्या व्यक्तीने कोविड १९ चे निदान झाल्यामुळे जरी आत्महत्या केली असेल, तरी त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास ५० हजार रुपये इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून देण्यात येणार आहे. हे सानुग्रह सहाय्य देण्याकरिता कोविड-१९ मृत्यू प्रकरणे निर्धारित करण्यासाठी पडताळणी करण्यात येईल.

पडताळणीसाठी विविध मुद्दे शासन निर्णयात सविस्तरपणे देण्यात आलेले आहेत. ही मदत मिळण्यासाठी कोविड १९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेईवाईकाने राज्य शासनाने या करिता विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जदार स्वत: किंवा सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत सीएससी-एसपीव्हीमधून अर्ज करु शकेल.

या कामासाठी नव्याने वेब पोर्टल पुढील आठवड्यातच विकसित करण्यात येणार आहे. त्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज कसा करावा, तसेच संपूर्ण या योजनेची तपशीलवार कार्यपध्दती याची माहिती असेल. हे वेब पोर्टल कार्यान्वीत झाल्यानंतर सर्व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे याबाबत आपल्या स्तरावर याबाबतची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी. तसेच याबाबत प्रसिध्दी करावी.जिल्हा तसेच तालुका व गाव पातळीवर देतील आणि सर्व संबंधितांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने करावे, असे म्हटले आहे.

पॉझिटिव्ह अहवाल असतील तेच पात्र
ज्या व्यक्तीचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटिव्ह आला होता,किंवा आंतररुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल झालेल्या ज्या व्यक्तीचा कोव्हिड-१९ मुळे मृत्यू झाल्याचा क्लिनिकल अहवाल आला आहे, ते मृत्यू मदतीसाठी पात्र समजण्यात येतील, असे शासनाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

कोरोनाचे निदान झाल्याने आत्महत्या केलेल्यांनाही मदत
रुग्णालयाच्या बाहेर मृत्यू झाला असेल अथवा त्या व्यक्तीने कोविड १९ चे निदान झाल्यामुळे आत्महत्या केली असेल तरी त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाले असल्याचे समजण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × one =

Close