
कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभावर गर्दी
पुणे : कोरेगाव भीमा या ठिकाणी आज २०५ वा शौर्य दिन साजरा होत आहे. शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांना मोठी गर्दी केली आहे. आज दिवसभरात लाखो आंबेडकर अनुयायी आले होते. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रकाश आंबेडकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार जितेंद्र आव्हाड आदी नेतेही दाखल झाले होते.
१ जानेवारी १९२७ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विजय स्तंभास भेट दिली होती. या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लाखो आंबेडकर अनुयायी दाखल झाले होते. पहाटेपासूनच विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. १ जानेवारी १८१८ रोजी म्हणजेच २०५ वर्षांपूर्वी कोरेगाव भीमा येथे ब्रिटीश आणि पेशव्यांची लढाई झाली. या लढाईत महार आणि इतर समाजातील सैनिकांच्या पराक्रमामुळे ब्रिटिशांनी पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता. १ जानेवारी १९२७ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजयस्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला. तेव्हापासून या ठिकाणी शौर्य दिवस साजरा केला जातो. त्यामुळे दरवर्षी १ जानेवारीला येथे अभिवादनासाठी मोठी गर्दी होते.
१०० कोटींचा निधी देणार
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला घरूनच अभिवादन केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून त्यांनी घरूनच अभिवादन केले. विजयस्तंभ परिसर विकासासाठी घोषित केलेल्या १०० कोटी निधीची अंमलबजावणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
वादग्रस्त पोस्टवर कारवाईचे आदेश
शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणा-या १०० हून अधिक सोशल मीडिया पोस्ट शोधून काढल्या आहेत, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पोलिस अंकित गोयल यांनी दिली. आता त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. सोशल मीडियावरील पोस्ट चेकिंगमध्ये हा प्रकार उघडकीस आला. त्यांच्यावर तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.