
केरळमध्ये १२ तासांत दोन नेत्यांची हत्या
तिरुवनंतपूरम : केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यात विरोधी पक्ष भाजप आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या दोन नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कलम १४४ लावत जमावबंदी लागू केली आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या हत्यांचा निषेध करत कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
एसडीपीआयचे राज्य सचिव के. एस. शान यांची शनिवारी संध्याकाळी हत्या करण्यात आली. शान हे दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी कारमधून आलेल्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या शान यांना कोच्चीतील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
एसडीपीआयने या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांवर हत्येचा आरोप केला आहे. एसडीपीआय नेत्याच्या हत्येला १२ तास उलटत नाही तोच काही अज्ञातांनी केरळ भाजपचे ओबीसी विभागाचे सचिव रंजीत श्रीनिवासन यांची घरात घुसून हत्या केली. दोन राजकीय हत्यांनी केरळ हादरले आहे. दोन्ही हत्यांचा तपास केरळ पोलिसांकडून करण्यात येत आहे. भाजप आणि एसडीपीआयने एकमेकांवर हत्येचे आरोप केले आहेत. रंजीत यांच्यावर चाकूने वार करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे.
सर्व पक्षांच्या एकमेकांवर टीका
अमानुष हिंसेची कृत्ये राज्यासाठी धोकादायक आहेत. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. दुसरीकडे देवभूमी जिहादींसाठी स्वर्ग बनवल्याचा, आरोप भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांनी केरळ सरकारवर केला आहे. केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांनीही या हत्येचा निषेध केला आहे. एसडीपीआय पक्षाचे प्रमुख एमके फैजी यांनीही ट्विटरवरुन जातीय हिंसाचार घडवून जातीय सलोखा बिघडवणे हा संघ परिवाराच्या अजेंडा असल्याचा आरोप केला आहे.