January 22, 2022

केंद्र वारंवार चुक करतेय

Read Time:4 Minute, 25 Second

हरिव्दार : कुंभमेळ्याच्या आयोजनानंतर उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याचे सांगितले जात आहे. ऐन कोरोनाच्या काळात कुंभमेळ्यासारख्या गर्दी होणाºया सोहळ्याचे आयोजन करणे चूक असल्याचा आक्षेप घेतला जात होता. आता उत्तराखंड उच्च न्यायालयानेच या मुद्यांवरून उत्तराखंड राज्य सरकारचे कान उपटले आहेत. आधी आपण कुंभमेळ्याची चूक केली, आता चारधाम यात्रा. आपण वारंवार स्वत:च खजील होण्यासारख्या गोष्टी का करत आहोत?, अशा शब्दांत राज्य सरकारला सुनावतानाच तुम्ही कोर्टाला फसवू शकता, पण लोकांना नाही. हेलिकॉप्टर घ्या, जा आणि बघा केदारनाथ-बद्रीनाथला काय सुरू आहे, अशा कठोर शब्दांत उच्च न्यायालयाने सरकारच्या धोरणावर ताशेरे ओढले आहेत.

अशा ठिकाणी होणाºया गर्दीसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्य सरकारच्या कारभारावर परखड शब्दांत आक्षेप घेतला. यावेळी बोलताना उच्च न्यायालयाने उत्तराखंड सरकारने या सगळ्या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचे नमूद केले आहे. आधी आपण कुंभमेळ्याची चूक केली. आता चारधाम यात्रा सुरू आहे. राज्य सरकारचे या सगळ्याकडे दुर्लक्ष सुरू आहे. जा आणि बघा काय घडतेय. केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिरांमधल्या व्हीडीओमध्ये साधू कोणतेही सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळताना दिसत नाहीयेत. प्रार्थना करण्यासाठी का असेना, पण तुम्ही २३ साधूंना एकाच वेळी मंदिरात प्रवेश नाही देऊ शकत. हेलिकॉप्टर घ्या आणि जाऊन बघा काय घडतेय बद्रीनाथ-केदारनाथमध्ये, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारला सुनावले आहे.

आम्हालाच लाज वाटते जेव्हा
राज्य सरकारने या सगळ्या प्रकारात घेतलेल्या भूमिकेवर न्यायालयाने कठोर शब्दांत आक्षेप घेतला. जेव्हा राज्यातील जनतेसोबत काय सुरू आहे याविषयी विचारणा केली जाते, तेव्हा आम्हालाच लाज वाटते. आम्ही काय सांगणार? याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार आमचा नाही. ते सरकारचे काम आहे. तुम्ही न्यायालयाला फसवू शकता, पण लोकांना फसवू शकत नाहीत. राज्य सरकार लाखो लोकांच्या जिवाशी खेळत आहे. राज्या सरकार या सगळ्याकडे दुर्लक्ष करत आहे, असे न्यायालयाने यावेळी नमूद केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ जून रोजी होणार आहे.

कुंभमेळ्याच्या काळात मोठी रुग्णवाढ
१ एप्रिल ते ७ मे या कालावधीमध्ये उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ झाली. या कालावधीमध्ये उत्तराखंडच्या रुग्णसंख्यमध्ये तब्बल १ लाख ३० हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे. हे प्रमाण देखील उत्तराखंडच्या एप्रिल महिन्यापर्यंतच्या एकूण रुग्णसंख्येच्या जवळपास निम्मे होते. १ मे ते ७ मे या आठवड्याभरातच उत्तराखंडमध्ये तब्बल ८०६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात उत्तराखंडमधल्या रुग्णसंख्येत तब्बल १८०० टक्क्यांनी वाढ झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine − 2 =

Close