January 25, 2022

केंद्रात फेरबदल निश्चित!

Read Time:5 Minute, 25 Second

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची चर्चा रंगू लागली आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेला पराभव आणि आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा फेरबदल होणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांना लवकरच गिफ्ट मिळणार असल्याचे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारच्या सत्ताधारी यंत्रणेत महत्त्वाची भूमिका बजावणारे शिंदे यांना मंत्रिपद देणे जवळपास निश्चित झाले असून, त्यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाचा पदभार दिला जाऊ शकतो, असेही सांगितले जात आहे.

पश्चिम बंगालमध्ये झालेला पराभव आणि आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा फेरबदल होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत आढावा बैठक घेतली होती. तसेच मोदींनी काही मंत्र्यांशी वैयक्तिक चर्चा सुरू केली असून त्यांच्या कामकाजाचा आढावाही घेतला. शिंदे यांचे समर्थक असलेल्या एका नेत्याने सांगितले की, शिंदे यांना रेल्वे मंत्रालय मिळण्याची शक्यता आहे. तसेच नगरविकास किंवा मनुष्यबळ यासारखी महत्त्वाची मंत्रालयेही देण्याची चर्चा आहे. शिंदे यांना भाजपमध्ये येऊन १५ महिने झाले आहेत. आता त्यांना दिलेले आश्वासन भाजप पूर्ण करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यास दुस-या काळातील मोदी सरकारचा हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार असेल. फेरबदलासाठी एकूण २३ खाते निवडण्यात आल्याचे समजते. या खात्याच्या मंत्र्याच्या कामाची स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौकशी केली. पंतप्रधानांनी आतापर्यंत धर्मेंद्र प्रधान, नरेंद्रसिंह तोमर, गजेंद्रसिंह शेखावत, महेंद्रनाथ पांडेय, हरदीप पुरी आदी मंत्र्यांशी संवाद साधून त्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच इतरही काही मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांंनी दिली.

यांच्या नावांची चर्चा
मंत्रिमंडळाच्या फेरबदलात आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी, डॉ. संजय जायस्वाल, ज्योतिरादित्य शिंदे, बैजयंत पांडा यांच्या नावांची चर्चा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात जेडीयू आणि अपना दलला प्रतिनिधित्व दिले जाऊ शकते. कारण जदयूने मंत्रिमंडळात संधी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अशा स्थितीत लोकजनशक्ती पार्टीचे चिराग पासवान यांचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सध्या या मंत्र्यांवर अतिरिक्त भार
-पियूष गोयल यांच्याकडे वाणिज्य, रेल्वे मंत्रालयाव्यतिरिक्त ग्राहक मंत्रालयाचा कारभार
-माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पर्यावरणासह अवजड उद्योग मंत्रालयाची जबाबदारी
-कृषी, पंचायतराज, ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे अन्न प्रक्रियेचा अतिरिक्त कार्यभार.
-आयुष मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे

आता केंद्रीय मंत्रिमंडळात ५९ मंत्री
गेल्या एक वर्षापासून कोरोनामुळे कॅबिनेटच्या विस्ताराची परिस्थिती निर्माण होऊ शकली नाही. मात्र मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची तयारी सुरू आहे. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात सध्या २१ कॅबिनेट आणि ९ स्वतंत्र प्रभारी राज्यमंत्री आणि २९ राज्यमंत्री आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen − five =

Close