केंद्राचा राज्यांना अलर्ट

Read Time:3 Minute, 25 Second

नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या आता वेगाने वाढत आहे. तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या दक्षिणतील राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. या दक्षिणेत ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत चालला आहे, तर येत्या काही दिवसांत ख्रिसमस सुरू होत आहे आणि नवीन वर्षाच्या पार्ट्याही होणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना पुन्हा अलर्ट केले आहे.

तामिळनाडूत ३३ नवीन रुग्ण आढळून आल्याने राज्यातील रुग्णांची संख्या ३४ झाली आहे. कर्नाटकात आज आणखी १२ नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यातील ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या ही ३१ झाली आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर के म्हणाले. दुसरीकडे केरळमध्येही ओमिक्रॉनचे ५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. या सर्वांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विणा जॉर्ज यांनी दिली.

केंद्राचे राज्यांना निर्देश
– सतर्क राहा आणि केस पॉझिटिव्हिटीचे निरीक्षण, रुग्ण दुप्पटीचा वेग आणि जिल्ह्यांतील नवीन रुग्णांचे क्लस्टर करा
– आगामी सण आणि उत्सवाचा काळ पाहता स्थानिक पातळीवर निर्बंध आणावेत. नाइट कर्फ्युसह इतर उपाययोजना कराव्या
– नाइट कर्फ्यू लावावा आणि मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असलेल्या ठिकाणांवर कडक निर्बंध आणावेत
– ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत तिथे कन्टेन्मेंट झोन, बफर झोन निश्चित करावेत
-करोनावरील लसीसाठी पात्र असलेल्या आणि लसीचा पहिला आणि दुसरा डोस न घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या लसीकरणावर भर द्यावा
– व्यापक लसीकरण मोहीम राबवावी आणि राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत कमी लसीकरण झालेल्या ठिकाणी घरोघरी जाऊन लसीकरण करावे

…तर राज्यातही नाईट कर्फ्यू
देशभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वेगाने फैलाव होत असल्याने केंद्र आणि राज्य स्तरावर आता पुन्हा एकदा नाईट कर्फ्यूसह अन्य उपाययोजनांवर चर्चा सुरू झाली आहे. ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या याच वेगाने वाढत राहिल्यास येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातही नाईट कर्फ्यू लागू होऊ शकतो, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत दिले.

Leave a Reply

Your email address will not be published.

19 − eight =