कृषि क्षेत्रात ड्रोन वापराने वर्षात ५० लाख नोक-या

Read Time:2 Minute, 41 Second

नागपूर : कृषि क्षेत्रात ड्रोनचा वापर केल्याने केवळ एका वर्षात ग्रामीण भागात सुमारे ५० लाख नोक-या निर्माण होऊ शकतात. यासंदर्भात मी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र स्ािंह तोमर आणि केंद्रीय एमएसएमई मंत्री नारायण राणे यांच्याशी धोरण निर्मितीबाबत चर्चाही केल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

नागपुरात ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ प्रदर्शनाच्या समारोप समारंभात गडकरी यांनी हे विधान केले. ड्रोनचा कृषि आणि एमएसएमईशी संबंध आहे. शेतक-यांसाठी हे खूप लाभदायक ठरणार आहे, असेही गडकरी यांनी पुढे सांगितले. यावेळी त्यांनी त्यांच्या शेतात ड्रोन वापरण्याचे स्वत:चे उदाहरण देत, कीटकनाशकांची फवारणी कमी करण्यावर भर दिला.

लिथियम-आयन बॅटरीने चालणा-या ड्रोनची किंमत सुमारे सहा लाख रुपये असेल, तर फ्लेक्स इंजिन असलेले आणि इथेनॉल इंधनावर चालणारे तेच मानवरहित ड्रोन दीड लाख रुपये इतक्या स्वस्त किंमतीत मिळेल. ड्रोनमधून कीटकनाशकांच्या फवारणीसाठी ते ऑपरेट करण्यासाठी पायलट लागतील आणि यामुळे मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे गडकरी म्हणाले.

ड्रोनच्या वापरासाठी मानक कार्यप्रणाली संच
गेल्या आठवड्यात केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांनी कीटकनाशके तसेच इतर माती आणि पीक पोषक फवारणीसह शेती क्षेत्रात ड्रोनच्या वापरासाठी मानक कार्यप्रणालीचा संच जारी केला होता. प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात त्यांनी कृषि कायदे पुन्हा आणले जातील, असे विधान केले होते, ज्यामुळे देशभरात त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकरी विरोधी कृषि कायदे पुन्हा आणल्यास शेतकरी पुन्हा मोठे आंदोलन करतील, असा इशारा दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.

2 × 3 =