
किल्ले शिवनेरीवर शिवजयंती उत्साहात
रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. तसेच किल्ले शिवनेरीवरदेखील शिवभक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली. येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी सर्वांनी शिवरायांना मानवंदना दिली. ढोलताशांचा गजर आणि पोवाड्यांचा आवाज आणि शिवरायांचा जयघोष याने शिवनेरी किल्ला दुमदुमला.
दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातही आज शिवजयंती साजरी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीदेखील शिवरायांना अभिवादन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी वंदन केले. मोदींनी शिवाजी महाराज यांना वंदन करतानाचा एक फोटो देखील ट्विटवर पोस्ट केला. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीदेखील ट्विट करीत वीर, पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना नमन करतो, असे म्हटले.
खा. संभाजीराजेंनी उपोषण करू नये
केंद्र सरकारनेच मराठा आरक्षणसंदर्भात कायदा करून आरक्षण देण्याचा प्रयत्न करायला हवा. आम्ही आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे अजित पवारांनी स्पष्ट केले. संभाजीराजे यांनी उपोषण आंदोलन करू नये, अशी विनंतीही अजित पवार यांनी केली. मात्र, खा. संभाजीराजे तेथे उपस्थित राहूनही व्यासपीठावर गेले नाहीत.