August 19, 2022

काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्रान

Read Time:1 Minute, 56 Second

श्रीनगर : दक्षिण काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. अमशीपोरा गावात शुक्रवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती. यात लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्रान घालण्यात आले. चकमक झालेल्या ठिकाणी दोन दहशतवाद्यांच्या मृतदेहासह मोठ्या प्रमाणावर दारुगोळा आणि आक्षेपार्ह साहित्य सापडले आहे.

चकमकीत ठार झालेले दोघेही स्थानिक असल्याची माहिती समोर येत आहे. अद्याप चकमकीबद्दल अधिकृतरित्या त्यांची नावे किंवा इतर माहिती सांगण्यात आलेली नाही. दोघांना ठार केल्यानंतर सुरक्षा दलाने शोध मोहीम सुरू ठेवली होती. मात्र परिसरात आता कोणी दहशतवादी लपला नसल्याची खात्री झाल्यानंतर शोध मोहिम थांबवण्यात आली. अमशीपोरा गावात दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली.

त्यानंतर लष्कर, पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त दलाने या परिसरात शोध मोहिम सुरु केली. गावाला घेराव घातल्यानंतर सुरक्षा दलाचे जवान घरांची झडती घेत असताना गोळीबार सुरु झाला. याला प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. जवळपास दोन तास चकमक सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

12 − 8 =

Close