January 19, 2022

कायम कृपादृष्टी ठेवून राज्याची भरभराट करावी

Read Time:3 Minute, 36 Second

पंढरपूर : महाराष्ट्र राज्यावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट करावी व राज्यातील शेतकरी व कष्टकरी यांना यश द्यावे. राज्यातील प्रत्येकाच्या घरात धनधान्य, सुख-शांती व समृद्धी नांदावी. राज्य, देश आणि जगातील कोरोनाचे संकट कायमचे दूर व्हावे, तसेच सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहण्याची महाराष्ट्राची परंपरा कायम राहावी, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री विठ्ठल चरणी घातले.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उपमुख्यमंत्री पवार आणि सौ. पवार यांचा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जि. प. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, सौ. सारिका भरणे, मानाचे वारकरी कोंडीबा टोणगे, सौ. प्रयागबाई कोंडिबा टोणगे, आमदार समाधान आवताडे, नगराध्यक्षा सौ. साधना भोसले आदी उपस्थित होते.

श्री विठ्ठलाच्या आशीर्वादाने राज्यावर आलेले कोरोनाचे संकट कमी होत असून येणा-या काळात संपूर्ण जगातून कोरोना नाहीसा होवो हीच विठ्ठला चरणी प्रार्थना आहे असे सांगून पवार म्हणाले की, चीन, रशिया व युरोप देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शासन कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी विविध उपाययोजना राबवित आहे. तरी प्रत्येक नागरिकांनी योग्य ती दक्षता घेणे गरजेचे आहे. कोरोना काळात आपल्या जिवाभावाचे अनेक लोक दगावले. या काळात माणसाचा जीव खूप महत्त्वाचा होता तसेच आपली श्रद्धा ही महत्त्वाची आहे. त्यामुळे राज्यात कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्याचे पाहून सर्व प्रशासकीय नियमाचे पालन करून राज्यातील सर्व मंदिरे खुली करण्याचा शासनाने निर्णय घेतला. तसेच कार्तिकी वारीसही परवानगी दिली.

यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × two =

Close