July 1, 2022

कर, दंड भरून उरलेले परत द्या

Read Time:3 Minute, 21 Second

कानपूर : उत्तर प्रदेशातील परफ्यूम व्यापारी पीयूष जैन यांनी छापेमारीत जप्त करण्यात आलेले रक्कम परत देण्याची मागणी केली आहे. कोट्यवधी रुपये कर चुकविल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला कानपूरचा परफ्यूम व्यापारी पियुष जैन याने जप्त केलेल्या पैशांची मागणी करत कोर्टात धाव घेतली आहे. कोर्टाकडून ५२ कोटी रुपयांचा कर आणि दंड कापून उर्वरित रक्कम परत देण्यात यावी अशी मागणी त्याने केली आहे.

पीयूष जैन यांनी जीएसटी इंटेलिजेंस डायरेक्टोरेट जनरल (डीजीजीआय) ला कर आणि दंड वजा करून त्यांच्या घर आणि परिसरातून जप्त केलेली मोठी रोकड परत करण्यास सांगितले आहे. करचुकवेगिरीच्या आरोपाखाली जैन यांना अटक करण्यात आली असून त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

डीजीजीआयचे विशेष सरकारी वकील म्हणजेच अधिवक्ता अमरीश टंडन यांनी बुधवारी न्यायालयाला माहिती दिली की, पीयूष जैन यांनी कर चुकवल्याची कबुली दिली आहे आणि करचुकवेगिरी आणि दंडासह ५२ कोटी रुपये थकित आहेत. त्याच वेळी, पीयूष जैन यांच्या वकिलाने डीजीजीआयला पीयूष जैन यांच्यावरील ५२ कोटी रुपये दंड म्हणून कापून उर्वरित रक्कम परत करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी केली आहे.

१९६ कोटींहून जास्त जप्त
इतिहासातील आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या जप्तींपैकी एक, डीजीजीआयने कानपूर आणि कन्नौजमधील पीयूष जैन यांच्या मालकीच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकून १९६ कोटी रुपयांहून अधिक रोख, २३ किलो सोने आणि ६ कोटी रुपयांचे चंदन तेल जप्त केले होते.

पैसे परत मिळणार का?
याला उत्तर देताना डीजीजीआयचे वकील अमरीश टंडन म्हणाले की, पीयूष जैन यांच्या घरातून जप्त करण्यात आलेली रक्कम ही करचोरी केलेली आहे, त्यामुळे ती परत केली जाणार नाही. विशेष सरकारी वकील टंडन पुढे म्हणाले की, जर पीयूष जैन यांना ५२ कोटी रुपयांचा अतिरिक्त दंड भरायचा असेल तर डीजीजीआय तो स्वीकारेल. पियुष जैन यांच्या कानपूर येथील निवासस्थानातून जप्त केलेले १७७ कोटी रुपये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) जमा करण्यात आले असून, ते भारत सरकारकडेच राहतील, असे टंडन यांनी न्यायालयाला सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

4 × two =

Close