January 19, 2022

करो या मरोमध्येही भारत पराभूत

Read Time:2 Minute, 44 Second

दुबई : न्यूझीलंडविरुद्धच्या आजच्या करो या मरो सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. भारताच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करल्यामुळे भारताला न्यूझीलंडसमोर १११ धावांचे माफक आव्हान ठेवता आले होते. या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग न्यूझीलंडच्या संघाने केला. त्यामुळे भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा आता जवळपास संपुष्टात आल्याचे म्हटले जात आहे.

भारताच्या १११ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलने आक्रमक सुरुवात केली. पण जसप्रीत बुमराहने त्याला बाद केले. त्यानंतर न्यूझीलंडचा दुसरा सलामीवीर डॅरिल मिचेलने भारताच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. मिचेलने यावेळी ३५ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ४९ धावा केल्या, त्याचे अर्धशतक फक्त एका धावेने हुकले. पण बाद होण्यापूर्वी मिचेलने न्यूझीलंडला विजय मिळवून देण्यात आपली भूमिका चोख बजावली होती.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघातील आघाडीचे फलंदाज पुन्हा अपयशी ठरले. सलामीवीर राहुल आणि किशन जोडी स्वस्तात बाद झाली. त्यानंतर हिटमॅन रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. त्यामुळे न्यूझीलंडविरोधातही मोठी धावसंख्या उभारण्यात भारतीय संघाला अपयश आले. त्यामुळे टी-ट्वेंटी विश्वकप स्पर्धेत सलग दुसरा नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला.

उपांत्य फेरीच्या आशा धूसर
विल्यमसनने डेव्हॉन कॉन्वेला सोबत घेत १५ व्या षटकात न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विल्यमसन ३३ धावांवर नाबाद राहिला. या विजयासह न्यूझीलंडने आपले गुणांचे खाते उघडले, तर पराभवामुळे भारताची उपांत्य फेरी गाठण्याची आशा धुसर झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen − four =

Close