करेक्ट कार्यक्रमाच्या पुढे एक करेक्ट कार्यक्रम असतो

Read Time:3 Minute, 35 Second

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून विधान परिषदेत नियुक्ती करण्यासाठी देण्यात आलेली १२ आमदारांची यादी अद्यापही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे प्रलंबित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी राज्यपालांची भेट घेतली असून यासंबंधी पत्रही दिले आहे. यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या यादीतील नावावरून संभ्रम निर्माण झाला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शेट्टी यांच्या नावास आक्षेप घेतल्याचे सांगितले जात असून, राष्ट्रवादी काँग्रेसने राजू शेट्टींचे नाव वगळण्याचा निर्णय घेतल्याचीही एक चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप राष्ट्रवादीकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, राजू शेट्टी यांनी याबाबत नाराजी जाहीर केली असून करेक्ट कार्यक्रमाच्या पुढे एक करेक्ट कार्यक्रम असतो, तो मी करेन असा इशाराच त्यांनी राष्ट्रवादीला दिला आहे.
शनिवारी राजू शेट्टी यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला.

यावेळी लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीचा झालेला एक समझोता होता. तो पाळायचा किंवा धारदार खंजीर खुपसायचा हे राष्ट्रवादीने ठरवायचे आहे. आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही काय त्यांच्या दारात भीक मागायला गेलो नव्हतो. त्यामुळे काही झाले तरी मला आमदार करा, नाहीतर जीव सोडणार असे माझे म्हणणे नाही आहे, असे राजू शेट्टी म्हणाले. याचबरोबर, गेल्या अडीच वर्षांपासून मी कोणत्याच पदावर नाही. त्यामुळे काय लोकांच्या मनातील स्थान कोणी हिरावून घेऊ शकत नाही. करेक्ट कार्यक्रमाच्या पुढे एक करेक्ट कार्यक्रम असतो, तो मी करेन असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.

जयंत पाटलांची प्रतिक्रिया
जयंत पाटील म्हणाले, विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या यादीत कुणाचेही नाव वगळण्यात आलेले नाही. आम्ही पुन्हा एकदा राज्य सरकारच्या वतीने राज्यपालांना विनंती केलेली आहे. तीनही पक्षांच्या सहमतीनेच राज्यपालांना प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यावर राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे. कारण लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवले जात आहेत, असे महाराष्ट्रातील जनतेला आता वाटायला लागले आहे. बराच काळ झाला त्याच्यावरचा निर्णय येत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

8 + 8 =