June 29, 2022

कच्चे तेल महागले; महागाई वाढणार?

Read Time:5 Minute, 6 Second

नवी दिल्ली : कच्च्या तेलाचा भाव ८० डॉलरवर गेला असल्याने नजीकच्या काळात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची शक्यता धूसर झाली असून, पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवार दि. ७ जानेवारी रोजी इंधन दर जैसे थे ठेवले. सलग ६५ दिवस इंधन दर स्थिर आहेत. मात्र जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज वाढ झाली आहे. यामुळे आगामी काही दिवसांमध्ये देशातील महागाई दरात याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता अर्थ तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

शुक्रवारी ब्रेंट क्रूडचा भाव १.४७ टक्क्यांनी वधारला आणि तो ८१.४४ डॉलर प्रती बॅरल झाला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ७९.४६ डॉलर प्रती बॅरल आहे. मुंबईत आज एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.४० रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे. भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव १०७.२३ रुपये आहे. मुंबईत आज एक लीटर डिझेलचा भाव ९४.१४ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८६.६७ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत आज डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.४३ रुपये असून कोलकात्यात डिझेलचा भाव ८९.७९ रुपये कायम आहे. भोपाळमध्ये डिझेलसाठी ९०.८७ रुपये दर आहे.

खाद्यतेल दरात मोठी वाढ होणार?
नव्या वर्षात खाद्यतेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. २०२२ मध्ये उत्पादन आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किमतीत वाढ करण्याची शक्यता आहे. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने या कंपन्यांनी याआधीच २०२१ वर्षात दोन ते तीन वेळा उत्पादनांच्या किंमतीत वाढ केली होती. कोरोनामुळे पुरवठा साखळीवर खूप मोठा परिणाम झाला आहे. याचा परिणाम उत्पादनांच्या किमतीवरही दिसून येत आहे.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महागणार?
पुढील तीन महिन्यांमध्ये उत्पादनांच्या किमतीत ४ ते १० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता एफएमसीजी कंपन्यांनी व्यक्त केली आहे. डिसेंबर महिन्यात इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी उत्पादनांच्या किमतीत ३ ते ५ टक्क्यांची वाढ केली आहे. या महिन्यात फ्रीज, वॉशिंग मशीन, एसीच्या किमती वाढल्या आहेत. येत्या महिन्याभरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमतीत १० टक्के वाढ होणार आहे.

ऑटो कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात दरवाढ
ऑटो सेक्टरमध्ये महागाईची लाटच आली असून, या वर्षात ऑटो कंपन्यांकडून उत्पादनांमध्ये बरीच दरवाढ केलेली पाहायला मिळणार आहे. मारुती सुझूकी, टाटा मोटर्स, हुंडाई, महिंद्रा अँड महिंद्रा, स्कोडा, वोक्सवॅगनसारख्या कंपन्या याधीच उत्पादनांच्या किमतीत वाढ करून झाले आहेत.

१२ टक्क्यांपर्यंत दरवाढ
एफएमसीजी कंपनीत गेल्या दोन तिमाहीत हिंदुस्थान युनीलिव्हर, डाबर, ब्रिटानिया, मॅरिकोसारख्या कंपन्यांनी आपत्या उत्पादनांच्या किमतीत ५ ते १२ टक्क्यांची वाढ केली आहे. नववर्षात पहिल्या तिमाहीपर्यंत ५ ते १० टक्क्यांची आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. महागाईच्या पार्श्वभूमीवर आम्हाला याआधीच कंपनीच्या उत्पादनावर ४ टक्क्यांची दरवाढ करावी लागली आहे, असे डाबर कंपनीचे सीईओ मोहित मल्होत्रा यांनी सांगितले. येत्या काळात महागाईचा दर स्थिर राहिला तर किमती कमी करण्याच विचार केला जाऊ शकेल, पण सध्या तसे काही चित्र दिसून येत नाही, असंही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

fifteen − 1 =

Close