औरंगजेबाच्या कबरीवरून हमरी-तुमरी

Read Time:3 Minute, 50 Second

मुंबई : एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी औरंगाबाद दौ-यावर असताना त्यांनी खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतल्याने ‘एमआयएम’ नेत्यांवर टीकेची झोड सुरु आहे. त्यातच आता शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी एमआयएम नेत्यांना हे तुम्ही दिलेले आव्हान असून आपण स्वीकारले असल्याचे म्हटले आहे.

औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांनी बांधली आहे. त्याला कबरीत आम्ही टाकले आहे. तुम्ही कबरीवर येऊन नमाज पठण करत आहात, कधीतरी तुम्हालाही त्याच कबरीत जावे लागेल, असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्राला खिजवण्यासाठी या कबरीवर गुडघे टेकत महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचे ओवेसी बंधूंचे राजकारण दिसत आहे. पण औरंगजेबाला याच मातीत मराठ्यांनी गाडले होते, हे विसरू नका असा इशारा दिला.

काश्मिरी पंडिताच्या हत्येबाबत ते म्हणाले की, काश्मीर खो-यात सातत्याने काश्मिरी पंडितांची हत्या केली जात आहे. काल एक तरुण सरकारी कर्मचारी काश्मिरी पंडिताची आपल्या कार्यालयात काम करत असताना हत्या झाली. काश्मीरमधील स्थिती पुन्हा एकदा बिघडविण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हे गांभीर्याने घेतले पाहिजे.

काही काळ राजकारण दूर ठेवले पाहिजे. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, काश्मिरी पंडितांचे प्रश्न हनुमान चालिसा, लाऊडस्पीकर असे मुद्दे उचलून तुम्ही विचलित करू शकत नाही. देशाचे याकडे बारीक लक्ष आहे. शिवसेना याकडे अत्यंत संवेदनशीलपणे पाहत आहे. जे शक्य असेल ते आम्ही करु. पण सरकार काय करत आहे. सरकारला इतर विषय बाजूला ठेवून काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेकडे पाहाते लागेल.

एकनाथ शिंदेंकडून निषेध
औरंगजेब स्वराज्याचा शत्रू होता. त्याने हिंदूंच्या देवस्थानांची नासधूस केली. ज्यांनी स्वराज्याशी द्रोह केला अशा औरंगजेबाच्या कबरीला एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी भेट देतात. ओवेसींनी जे केले त्याचा मी निषेध करतो, अशी संतप्त प्रतिक्रिया नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

ओवेसींना औरंगजेबाकडे पाठवतो : नीतेश राणे
‘एमआयएम’चे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांची औरंगजबाच्या कबरीला भेट दिल्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत असून या भेटीचा निषेध करीत भाजप नेत्यांनी ओवेसी यांच्यावर जहरी शब्दांत टीका केली. ‘पोलिसांना १० मिनिटे बाजूला करा, ओवेसींना औरंगजबाकडे पाठवून दाखवतो,’ असे ट्विट करून भाजप आमदार नीतेश राणे यांनी ओवेसी यांना आव्हान दिले.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

10 − six =