ओमिक्रॉन जगासाठी अत्यंत धोकादायक

Read Time:3 Minute, 18 Second

जिनेव्हा : कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन हा जगासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेनं केलंय. जागतिक आरोग्य संघटनेने आज सोमवारी याबाबतचा इशारा देताना म्हटले की, अत्यंत संक्रमणकारी आणि धोकादायक असणा-या विषाणूबाबतची अनिश्चितता कायम आहे. डब्ल्यूएचओने पुढे म्हटले की, जर या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे पुन्हा एकदा मोठी लाट आली तर त्याचे परिणाम हे अत्यंत गंभीर असू शकतात. मात्र, अद्यापपर्यंत तरी ओमिक्रॉन व्हेरियंटशी निगडीत एकही मृत्यूची नोंद झालेली नाही.

जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या शुक्रवारी कोरोनाच्या या बी.१.१.५२९ व्हेरियंटचे नामकरण करुन त्याचं नाव ओमिक्रॉन असे ठेवले आहे. सर्वांत आधी हा व्हेरियंट दक्षिण आफ्रिकेत आढळला असून तो हळूहळू आपले पाय पसरत आहे. कोरोनाचे इतर व्हेरियंट डेल्टा, अल्फा, बीटा, गॅमा यांच्याप्रकारेच ओमिक्रॉन देखील अत्यंत चिंताकारक अशा वर्गीकरणात मोडतो. त्यामुळे अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील प्रतिबंध पुन्हा एकदा लादले आहेत.

जगावर भीतीची छाया
जगाला पुन्हा भीतीच्या छायेत घेऊन जाणा-या ओमिक्रॉन या नव्या कोरोना विषाणूचे फोटो पहिल्यांदाच समोर आले आहेत. इटालियन संशोधकांच्या टीमने या विषाणूचे फोटो प्रकाशित केले आहेत. या टीमने म्हटले, या नव्या फोटोच्या तीन पद्धतींनी अभ्यास केल्यानंतर हा नवा व्हेरियंट स्वत:ला मानवाप्रमाणे बदलत असल्याचे हे समोर आले आहे. स्वत:ला तो परिस्थीतीशी जुळवून घेत आहे. त्याचबरोबर तो सातत्याने म्युटेट होत असल्याचेही या संशोधकांनी म्हटले आहे.

मानवी पेशींच्या संपर्कात नवा व्हेरियंट
संशोधकांनी म्हटलंय की, मानवाच्या शरिरात जिथं प्रथिनं आहेत त्या प्रत्येक भागात ओमिक्रॉन अस्तित्वात असून तो सातत्यानं मावनी पेशींच्या संपर्कात आहे. पण याचा अर्थ असा नाही की, हा खूपच जास्त किंवा कमी धोकादायक आहे. वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, हा व्हेरियंट डेल्टा किंवा इतर अन्य व्हेरियंटच्या तुलनेत किती धोकादायक आहे याच्या माहितीसाठी यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

twenty + eleven =