ओमिक्रॉनची भारतात एन्ट्री

Read Time:6 Minute, 55 Second

नवी दिल्ली : ओमिक्रॉन व्हेरिएंटला रोखण्यासाठी भारत सरकारने युद्धपातळीवर पावले टाकत आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांबाबत कठोर धोरण राबवले. मात्र, त्यानंतरही ओमिक्रॉनने भारतात शिरकाव केला असून कर्नाटकात आज दोन रुग्ण आढळून आले आहेत. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी माहिती दिली.

दरम्यान, ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडल्याने लॉकडाऊनची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, केंद्र सरकारने सध्या लॉकडाऊनची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले आहे.
जगभरात कोरोनाबाबत नव्याने धास्ती निर्माण करणारा ओमिक्रॉन व्हेरिएंट अद्याप भारतापासून दूर असल्यामुळे देशातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र, भारतीयांची ही निश्चिंतता अल्पजीवी ठरली. कारण भारतात ओमिक्रॉनचे २ रुग्ण आढळले असून आतापर्यंत एकूण २९ देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ओमिक्रॉन आता हळूहळू हातपाय पसरायला लागल्याचे चित्र दिसू लागले आहे.

अवघ्या दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्र्यानी हिवाळी अधिवेशना दरम्यान लोकसभेत बोलताना देशात एकही ओमिक्रॉनचा रुग्ण नसल्याची माहिती दिली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिका आणि आफ्रिकेतील इतर काही देशांमध्ये आढळलेला हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट भारतापासून अद्याप दूर असल्याचा दिलासा देशवासीयांना मिळाला होता. मात्र, आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकमध्ये दोन रुग्णांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळल्याची माहिती दिली आहे.

आतापर्यंत २९ देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेले एकूण ३७३ रुग्ण सापडल्याचेदेखील आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, कर्नाटकमध्ये सापडलेले ओमिक्रॉनचे दोन्ही रुग्ण हे परदेशी नागरिक असल्याची माहिती मिळत आहे. या दोघांचे वय ६६ वर्षे आणि ४६ वर्षे असे असून त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चौकशी करून त्यांची चाचणी करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

संपर्कात आलेले ५ जण पॉझिटिव्ह
दोनपैकी ४६ वर्षीय व्यक्तीच्या संपर्कात आलेले तिघेजण आणि या तिघांच्या संपर्कात आलेले दोघे जण असे पाच जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या पाचही जणांची २२ आणि २५ नोव्हेंबरला चाचणी घेण्यात आली होती. मात्र, आज ४६ वर्षीय व्यक्तीला ओमिक्रॉनची बाधा झाल्याने या पाच जणांची पुन्हा चाचणी घेण्यात आली. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना आयसोलेट करण्यात आले आहे.

दोन्ही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे
कर्नाटकात ओमिक्रॉनचा संसर्ग आढळून आलेल्या दोन्ही रुग्णांमध्ये कोरोनाची अत्यंत सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. त्यांच्यात कोणतीही गंभीर लक्षणे दिसत नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

घाबरून जाण्याची गरज नाही
ओमिक्रॉनचे २ रुग्ण सापडल्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नसल्याचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. घाबरून जाण्याची आवश्यकता नसली, तरी सतर्क राहाणे आवश्यक आहे. कोविडचे नियम पाळणे आणि गर्दी टाळणे हे महत्त्वाचे आहे, असे लव अग्रवाल म्हणाले. कोविड विषयक नियम आहेत, त्यांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, असे आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले.

ओमिक्रॉन डेल्टापेक्षा पाच पट घातक
कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टा व्हेरिएंटपेक्षा पाचपट अधिक घातक आहे आणि याचा फैलाव आधीच्या व्हेरिएंटपेक्षा अधिक वेगाने होतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. अशावेळी भारतात या व्हेरिएंटने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे.

डोंबिवलीतही ओमिक्रॉनचा रुग्ण?
दक्षिण आफ्रिकेतून नुकतीच डोंबिवलीत परतलेली एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आली होती. दक्षिण आफ्रिकेतच ओमिक्रॉनचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आल्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले होते. हा रुग्ण ओमिक्रॉनचाच आहे की कोरोनाच्या इतर व्हेरिएंटचा, याविषयी अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेली नाही.

पुढील २ आठवडे महत्त्वाचे
ओमिक्रॉनचे २ रुग्ण आढळल्यामुळे नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. पुढील २ आठवडे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. प्रत्येकाना स्वत:ला लॉकडाउन करून घ्यावे. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचा अधिक संसर्ग हा लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये झाला. यामुळे पालकांनी मुलांची खबरदारी घ्यावी, असे दिल्लीतील गंगाराम हॉस्पिटलचे डॉ. धिरेन यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

1 × 1 =