January 21, 2022

ऐन दिवाळीत सर्वसामान्यांचे निघणार दिवाळे!

Read Time:6 Minute, 7 Second

नवी दिल्ली : कोरोना संकटातून अर्थव्यवस्था सावरली असली तरी वाढत्या महागाईने ऐन दिवाळीत सर्वसामान्यांचे दिवाळे निघणार आहे. महिनाभरात पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसमध्ये झालेली भरमसाठ वाढ, मोबाईल आणि वीज बिलाचा वाढता बोजा, एसटीची भाडेवाढ हे कमी की काय तर आता दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किमतींत ११ टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा सण साजरा करताना ग्राहकांच्या खिशाला महागाईची झळ बसणार आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महागाईमुळे किरकोळ बाजारात साखरेचे भाव वाढले आहेत. गेल्या तीन महिन्यांत राजधानी दिल्लीत साखरेचे दर किलोमागे पाच रुपयांनी वाढले आहेत. ग्राहक व्यवहार विभागाच्या (डिपार्टमेंट ऑफ कंझ्युमर अफेअर्स) अहवालानुसार २६ ऑक्टोबर रोजी दिल्लीत साखरेचा दर ४३ रुपये प्रतिकिलो होता, तर २६ जुलै रोजी हा दर ३८ रुपये प्रतिकिलो होता. त्याचबरोबर मागील काही आठवडे भाजीपाला, टोमॅटो आणि कांद्याच्या दरवाढीने सामान्यांची पुरती कंबर मोडली आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोचा भाव ३० ते ४० रुपयांच्या दरम्यान असून कांदे ४० रुपयांच्या दरम्यान आहेत. सध्या भाजीपाल्याचे दर उच्चांकी आहेत. त्यामुळे घरातील बजेट कोलमडून गेले आहे.

यासोबतच डिटर्जंट पावडरपासून ते शॅम्पूपर्यंत सर्व दैनंदिन वापराच्या वस्तू महाग झाल्या आहेत. फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स कंपनी प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थने त्यांच्या सर्व उत्पादनांच्या किमती ४ ते ११ टक्क्यांनी वाढवल्या आहेत. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. एका रिटेल इंटेलिजेन्स प्लॅटफॉर्मनुसार कंपनीने जुलैपासून एरियल आणि टाइड या डिटर्जंट पावडर ब्रँडच्या मोठ्या पॅकच्या किमती ४-५ टक्क्यांनी वाढवल्या आहेत, तर पॅन्टीन आणि हेड अँड शोल्डर्स या पर्सनल केअर ब्रँडच्या किमतीमध्ये १० ते ११ टक्के वाढ झाली आहे.
दुस-यांदा दरवाढ

पी अँड जी ने जागतिक स्तरावर याचप्रमाणे किमती वाढवल्या आहेत. गेल्या आठवड्यात कंपनीने जाहीर केले की, ते जास्त मालवाहतूक आणि कच्च्या मालाच्या किमतीमुळे सौंदर्य, ओरल आणि स्किनकेअर उत्पादनांच्या किमती वाढवत आहेत. दरवाढ करण्याची कंपनीची ही दुसरी वेळ आहे. याआधीही कंपनीने आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या होत्या. त्यामुळे त्यासाठीही जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
या कंपन्यांनी वाढवले दर

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्टस्, मॅरिको आणि डाबर इंडिया यासारख्या अनेक एफएमसीजी कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत, जेणेकरून जास्त किमतीमुळे त्यांच्या मार्जिनवर होणारा परिणाम कमी करता येईल. पी अँड जीने १ किलो आणि त्याहून अधिक वजनाच्या मोठ्या पॅकेट्सच्या किमती वाढवण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून सामान्य माणूस आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांद्वारे वापरल्या जाणा-या छोट्या पॅकेटस्वर भार पडू नये. एरियल आणि टाइडसारख्या डिटर्जंट पावडरच्या छोट्या पॅकेटस्च्या किमती वाढवण्यात आलेल्या नाहीत. मात्र, लहान आणि मध्यम पॅकेटस्च्या विक्रीत जुलैमध्ये ४-५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पी अँड जीने भारतात व्हिस्पर सॅनिटरी पॅडस्च्या किमती वाढवल्या नाहीत.

पेंट्सही झाले महाग
एशियन पेंटस् आणि बर्जर पेंटस्सारख्या पेंट कंपन्यांनी किमती ९-११ टक्क्यांनी वाढवल्या आहेत, ज्या आतापर्यंतच्या सर्वाधिक आहेत. पेंट कंपनी बर्जर पेंटस्ने रंगांच्या (पेंटस्च्या) किमतीत ८ ते ९ टक्के वाढ जाहीर केली आहे. १२ नोव्हेंबरपासून नवीन दर लागू होणार आहेत. वाढत्या इनपूट खर्चाची भरपाई करण्यासाठी बर्जर पेंटस्ने हा निर्णय घेतला आहे. पेंटस् कंपन्यांनी केलेली ही आतापर्यंतची सर्वात जलद दरवाढ आहे. गेल्या सहा महिन्यांत ७.५ टक्के दरवाढीचा निर्णय घेतलेल्या एशियन पेंट्सने आणखी ७-१० टक्क्यांनी दरवाढ करण्याची योजना आखली आहे. तसेच बर्जर पेंटस्नेही किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ten + two =

Close