एस. टी. कर्मचा-यांच्या संपास हायकोर्टाची मनाई

Read Time:2 Minute, 16 Second

मुंबई : एसटी महामंडळ कर्मचा-यांना संप करण्यास मुंबई हायकोर्टाने मनाई केली आहे. एसटी महामंडळाने केलेल्या अर्जावर हायकोर्टाने अंतरिम आदेश दिला आहे. हायकोर्टाचा हा निर्णय संप सुरू ठेवण्याच्या भूमिकेत असणा-या एस. टी. कर्मचा-यांसाठी धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

महागाई भत्त्यातील वाढीसह विविध मागण्यांसाठी काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांनी राज्यव्यापी संप पुकारला होता. कर्मचा-यांच्या संपामुळे एसटी सेवा ठप्प झाली आणि राज्यभरात नागरिकांना प्रवासासाठी ऐनवेळी पर्यायी वाहन शोधावे लागले. प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत एसटी कर्मचा-यांच्या संघटनेची बैठक झाली आणि या बैठकीनंतर तोडगा निघाला.

सरकारने काही मागण्या मान्य केल्यानंतर एसटी कर्मचारी संघटनेने संप मागे घेण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात अनेक आगारांतील कर्मचा-यांनी संप सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली. एसटी कर्मचा-यांचे विलिनीकरण राज्य सरकारमध्ये करावे, अशी मागणी करत या कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा ऐन सणासुदीत प्रवाशांचे हाल सुरू झाले. एसटी कामगारांना ऑक्टोबरचे वेतन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोमवारी देण्यात आले. सुधारित महागाई भत्ता, घरभाडे आणि दिवाळी भेट असे या वेतनाचे स्वरूप आहे. सध्या ८५ टक्के वाहतूक सुरू आहे. कर्मचा-यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

seven − three =