एसटी बस आता पर्यावरणपूरक इंधनावर धावणार!

Read Time:5 Minute, 43 Second

मुंबई : देशात पेट्रोल, डिझेल दरवाढीचा धडाका सुरू आहे. त्यामुळे सामान्य माणूसच नव्हे, तर देशातील सर्वच नागरिकांच्या खिशाला मोठी झळ सोसावी लागत आहे. त्यामुळे जगणे महाग झाले आहे. त्यातच इंधन दरवाढीचा फटका सर्वांनाच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बसला आहे. याला ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी एसटी सेवाही सुटली नाही. कोरोना काळ, टाळेबंदी आणि त्यात इंधन दरवाढ यामुळे एसटी महामंडळाचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे एसटीचा तोटा तब्बल ५ हजार कोटींवर पोहोचला आहे. इंधनाचे वाढते दर आणि पडणारा आर्थिक बोजा विचारात घेऊन एसटी महामंडळाने पर्यावरणपूरक इंधनावर बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

डिझेलमुळे एसटीचा वाढता खर्च कमी करण्यासाठी एसटी महामंडळ धडपड करीत असून, त्याचाच भाग म्हणून सीएनजीसह इलेक्ट्रिक बस चालविण्याच्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत. त्यादृष्टीने एसटी महामंडळाने आता ताफ्यात सीएनजीवर धावणा-या बस दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही नवीन बस न घेता सध्या धावत असलेल्या बसपैकी १ हजार बस सीएनजीसाठी परावर्तीत केल्या जाणार आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यासाठी एकूण १४० कोटी रुपये खर्च येणार आहे, असे सांगण्यात आले. मात्र, सीएनजी स्टेशन मर्यादित असल्याने जिथे उपलब्ध आहेत, तिथेच सर्वप्रथम ही सीएनजी बसची सेवा सुरू करण्यात येईल, असेही सांगण्यात येत आहे. या निर्णयामुळे येत्या काळात डिझेलवरील खर्चाची बचत होणार आहे.

एसटी महामंडळ अगोदरच संकटात होते. त्यातच अगोदर एसटी महामंडळाच्या एकूण खर्चापैकी डिझेलवर होणारा खर्च ३४ टक्के होता. त्यातच डिझेलचे दर उच्चांकी स्तरावर गेल्याने सध्याच्या काळात हा खर्च ३८ ते ४० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आधीच कोरोनामुळे एसटी बस वाहतूक कोलमडून पडलेली असतानाच आता डिझेलचा खर्च वाढलेला आहे. त्यामुळे नेहमीच संकटाचा सामना करणारे एसटी महामंडळ अडचणीच्या गर्तेत अडकले आहे.

त्यातच आता राज्यात सर्व काही सुरळीत सुरू झाले असले तरी अजूनही एसटी सेवा प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी पूर्वीप्रमाणे पूर्ण क्षमतेने धावत नाही. याचा फार मोठा फटका एसटीला बसत आहे. अर्थात, एसटीच्या उत्पन वाढीवर मोठ्या मर्यादा आल्या आहेत. त्यातच कर्मचा-यांबरोबर वेतन करार, सरकारकडील थकीत अनुदान या सर्वांमुळे एसटीचा तोटा ५ हजार कोटींच्या पुढे पोहोचला आहे.

मुंबई, पालघर, रायगड, पुण्यात सर्वप्रथम सेवा
सीएनजी स्टेशन्स हे राज्यात सर्व ठिकाणी उपलब्ध नाहीत. त्यामुळे सध्या हे पंप उपलब्ध असलेल्या मुंबई, पुणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यातच सुरुवातीच्या काळात या सीएनजी बस धावणार आहेत. त्यामुळे सीएनजी बससेवा सुरुवातीला मर्यादित ठिकाणी सुरू राहील. त्यानंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने या सेवेची व्याप्ती वाढविण्यात येईल, असे सांगण्यात आले.

सीएनजीबरोबरच आता इलेक्ट्रिक बस वापरणार
एसटी महामंडळ सातत्याने संकटाचा सामना करीत आहे. त्यात इंधनावरील खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इंधनाचे वाढते दर आणि त्यातून नियमित वाढत जाणारा भार याचा विचार करून येत्या काळांत सीएनजीबरोबरच इलेक्ट्रिक बस, एलएनजीवर धावणा-या बस दाखल करून घेण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न आहे. यातून खर्चात बरीच बचत होणार असून, हा खर्च वाचल्यास एसटी महामंडळाची स्थिती सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

प्रदूषण कमी होण्यास मदत
‘बेस्ट’ बसप्रमाणे येत्या काळात एसटीचा संपूर्ण ताफा सीएनजी, इलेक्ट्रिक, एलएनजी अशा पर्यावरणपूरक इंधनावर परावर्तीत करण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न असणार आहे. यामुळे इंधनावरील खर्च खूप मोठ्या प्रमाणात कमी होईलच आणि प्रदूषण कमी करण्यास हातभार लावला जाईल, असा विश्वास एसटीच्या अधिका-यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published.

eighteen + 19 =