August 19, 2022

उमेदवारी देण्यावरुन झालेल्या मतभेदामुळे माजी खा. खतगावकर, माजी आ.पोकर्णा यांचा भाजपाला जय श्रीराम

Read Time:10 Minute, 47 Second

नांदेड : भाजपाचे जेष्ठ नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा माजी उपमहापौर सरजितसिंग गिल यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपाला जयश्रीराम करत शनिवारी आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निश्चय केला आहे.

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकी दरम्यान उमेदवारी देण्यावरुन झालेल्या मतभेदामुळे भाजपातील जेष्ठ नेते माजी खा.भास्काराव पाटील खतगार यांनी संताप व्यक्त करत मला निवडणुकीमध्ये उमेदवारी देत असताना माझे मत विचारात घेतले नाही. माझ्या मनाप्रमाणे उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यासह माझी नाराजी झाली आहे. हे कारण पुढे करत मी भाजपाचा राजीनामा दिला असून लवकरच माझ्या कार्यकर्त्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून देगलूर बिलोली मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवाराला निवडूण आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे काँग्रेसचा उमेदार निश्चतच विजयी होईल यात शंका नाही.

पत्रकार परिषदेत बोलताना माजी खा. खतगावकर म्हणाले की, भारताचे माजी गृहमंत्री श्रद्धेय डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या राजकीय तालमीमध्ये माझी जडणघडण झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक पदांवर काम करून लोकांना न्याय देण्याची संधी मला मिळाली. देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातून जनतेच्या आशीवार्दाने मी तीन वेळा विजयी झालो. त्यासोबतच लोकसभेतही तीन वेळा प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला जनतेने दिली.

संपूर्ण नांदेड जिल्ह्यासह माझे कार्यक्षेत्र राहिलेल्या बिलोली व देगलूर या दोन्ही तालुक्यातील सामान्य माणसाचा विकास हेच माझे प्रमुख ध्येय राहिले आहे. त्यामुळे जनतेने मला नेहमीच साथ दिली. मला तर निवडून दिलेच. परंतु, मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर मी दिलेल्या उमेदवाराला सुद्धा त्यांनी विजयी केले आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन मी भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मी भाजपात दाखल झालो, तेव्हा जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद सिमित होती. त्यामुळे नांदेड शहरासह ग्रामिण भागात पक्षाचा विस्तार करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले.

माज्या पुढाकारामुळे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार अविनाश घाटे, सध्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर, माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्यासारखी दिग्गज मंडळी भाजपात आली. पक्षाच्या ग्रामिण भागातील प्रत्येक बुथपर्यंत कार्यकर्ता निर्माण करण्याचे काम मी प्रामाणिकपणे केले. माज्या नेतृत्वाखालीच नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. मी पक्षात येण्याआधी जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे संख्याबळ केवळ २ होते. माज्याच काळात ते १४ पर्यंत वाढले. जिल्ह्यामधील कुंडलवाडी ही एकमेव नगरपालिका आहे, जिच्यावर माज्या नेतृत्वाखाली भारतीय भारतीय जनता पक्ष हा शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखला जातो. परंतु, बेशिस्तीचा कळस गाठण्याचे काम खा. चिखलीकर यांनी जिल्ह्यात केले आहे. ही बाब अनेकदा राज्याच्या नेतृत्वाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही दुदैर्वाने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. उलटपक्षी चिखलीकरांना अधिक ताकद देऊन भारतीय जनता पक्षात होणा-या अन्यायाला एकप्रकारे खतपाणी घातले गेले.

देगलूर-बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरवताना माझे मत विचारात घेणे अपेक्षित होते. परंतु, तसे न करता खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हट्टामुळे शिवसेनेतून आयात केलेल्या सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली. म्हणजे उमेदवार खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी ठरवायचा आणि त्याच्या पराभवानंतर त्याचे सारे खापर माज्यावर फोडायचे, असे कारस्थान चालू असल्याचे मला स्पष्ट दिसू लागले होते. भाजपातील एकाधिकारशाही, मित्रमंडळाचे वर्चस्व, निष्ठावंतांची मुस्कटदाबी व दलबदलुंना प्रोत्साहन यामुळे नांदेडची भाजप जणू चिखलीकरांची वैयक्तिक मालमत्ता झाली आहे. अशा ठिकाणी काम करणे माज्या मनाला पटणारे नाही.

त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असून, आजच काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे. माज्यासोबत माजी आमदार तथा भाजप कार्यकारिणी सदस्य ओमप्रकाश पोकर्णा, नांदेड महानगर भाजपचे उपाध्यक्ष व माजी उपमहापौर सरजितसिंग गिल, कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष बाबाराव पाटील भाले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजू गंदीगुडे, भाजप युवामोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवी पाटील खतगावकर, भाजप जिल्हा सचिव आनंदराव पाटील बिराजदार, बिलोलीचे माजी उपनगराध्यक्ष अनुप अंकुशकर, भाजपचे उत्तर नांदेड विधानसभा माजी अध्यक्ष दीपक पावडे आदी प्रमुख पदाधिकारी भाजपचा राजीनामा देत असून, ते देखील माज्या समवेत काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत. अशी माहिती माजी खाख़तगावकर यांनी दिली.

मा.खा. खतगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशाचे स्वागत
ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या घोषणेचे मी स्वागत करतो. त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे नांदेड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण मराठवाडयातील पक्ष संघटनेला अधिक बळकटी मिळेल, याचा मला विश्वास आहे. तसेच माजी मंत्री खतगावकर यांच्यासह काँग्रेस प्रवेशाची घोषणा करणारे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा व त्यांच्या इतर सहका-यांचेही मी पक्षात स्वागत करतो. त्यांच्यामुळे काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होईल.
-आशोक चव्हाण
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री नांदेड

एकमतचे भाकित खरे ठरले
भाजपातील एक माजी खा. लवकरच देगलूर विधानसभा निवडणुकीच्या आगोदर काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असे आशयाचे वृत्त दै.एकमत मधून ५ आक्टोबर रोजी प्रकाशीत झाले होते. या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय सुरु झाला होता. दै.एकमतने अभ्यासपूर्व माहिती घेवून वृत्त प्रकाशीत केले होते. त्यानंतर १६ ऑक्टोबर रोजी माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर व माजी आ.पोकर्णा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपाला जयश्रीरामकरत काँग्रेसमध्ये जाण्याचा निश्चय केला आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होण्याची शक्यता
लोकसभेतील राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे हे लवकरच देगलूर विधानसभा निवडणूक प्रचारासाठी येणार आहेत. त्यावेळी माजी खाख़तगावकर व इतर नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पांडागळे यांनी दादाच्या घरी तळ ठोकला
काँग्रेसचे जिल्हा पक्ष प्रवक्ता संतोष पांडागळे यांनी ना.चव्हाण यांच्या आदेशानूसार माजी खाख़तगावकर यांच्या निवासस्थानी शनिवारी सकाळ पासून तळ ठोकून बसले होते. दादांच्या काँग्रेस प्रवेशाच्या निश्चयाचे त्यांनी स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

eighteen − ten =

Close