उत्तर प्रदेशात आंदोलक शेतक-यांना चिरडले

Read Time:4 Minute, 30 Second

लखीमपूर : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या ताफ्यातील वाहनांनी कृषी कायद्यांचा विरोध करणा-या शेतक-यांना चिरडल्याची गंभीर घटना घडली आहे. यात २ शेतक-यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर जवळपास १५ ते २० जण जखमी झाले आहेत. दरम्यान, टेनी यांचा मुलगा मोनू मिश्रा यांनी थेट आंदोलक शेतक-यांवर गाडी चढविल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर आंदोलक शेतक-यांनी टेनी यांच्या मुलाच्या आणि भाजप कार्यकर्त्यांच्या ३ गाड्या पेटवून दिल्या. तसेच मारहाणही झाली.

या हिंसाचारात ६ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या घटनेचे वृत्त समजताच लखनौचे मंडळ आयुक्त आणि पोलिस महानिरीक्षकांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलिसही मोठ्या संख्येने तैनात केले आहेत. गंभीर स्थिती लक्षात घेऊन अन्य जिल्ह्यांतूनही सुरक्षा जवानांना पाचारण करण्यात आले आहे, तर जिल्हा प्रशासनाने लखीमपूर खेरी येथील इंटरनेट सेवा बंद केली आहे. यासंदर्भात एडीजी झोन ​​लखनौ एसएन साबट यांनी सांगितले की, आतापर्यंत २ मृत्यूची नोंद झाली आहे. आयजी रेंज लखनौ लक्ष्मी सिंह यांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे.

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा रविवारी (३ ऑक्टोबर) आपल्या गावात बनवीरमध्ये उपमुख्यमंत्री केशव प्रसाद यांना भेटणार होते. यावेळी शेतक-यांनी गावाच्या मैदानात बांधलेल्या हेलिपॅडवर कब्जा केला. तसेच टिकुनियामध्ये शेतकरी उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी उभे राहिले. याचवेळी लखीमपूर खेरीचे खासदार आणि गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा मोनू याने थेट शेतक-यांच्या अंगावर गाडी घातली, असा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला. त्यामुळे संतप्त शेतक-यांनी तोडफोड आणि जाळपोळ केली. दरम्यान, शेतकरी नेते राकेश टिकैत गाझीपूर येथील आंदोलनातून थेट लखीमपूर खेरीला रवाना झाले तर परिसरातील परिस्थिती बिघडल्यानंतर योगी सरकारने एडीजी (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांना लखीमपूर खेरीला पाठवले आहे.

शरद पवार यांनी केला निषेध
आमच्या शेतक-यांचा आवाज दाबण्याची ही अत्यंत क्रूर पद्धत आहे. मी उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करतो. असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ट्विट केले आहे. तसेच लखीमपूर खेरी नरसंहार असा हॅशटॅगदेखील त्यांनी ट्विटसोबत जोडलेला आहे.

कॉंग्रेसचा मोदींवर निशाणा
भाजपा शेतकरी चळवळीला, आंदोलनाला थांबवू शकला नाही. म्हणूनच त्यांनी शेतक-यांबाबत हे कृत्य केले. ही परिस्थितीला सर्वस्वी नरेंद्र मोदींचे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी जबाबदार आहेत, असा आरोप युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी केला. उद्या पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी घटनास्थळी जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × three =