January 22, 2022

इसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे- खासदार हेमंत पाटील

Read Time:3 Minute, 42 Second

हिंगोली लोकसभा मतदार संघातील कळमनुरी, उमरखेड, महागाव, हदगाव, हिमायतनगर तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता शेती, पिण्यासाठी  व जनावरांसाठी इसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात कालव्याद्वारे पाणी सोडण्यात यावे असे निर्देश खासदार हेमंत पाटील यांनी पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी नांदेड आणि यवतमाळ यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून दिले.

विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पैनगंगा नदीवर असलेल्या इसापूर धरणाने  समृद्ध केले आहे. नांदेड, हिंगोली व यवतमाळ जिल्ह्याच्या काही भाग या धरणामुळे सुजलाम सुफलाम झाला आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघातील कळमनुरी, उमरखेड, महागाव, हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर या भागातील जनतेला व शेतीला पाणीपुरवठा होत असतो. यंदाच्या उन्हाळ्यात पुन्हा एकदा कोरोना आजाराने शिरकाव केल्याने एकंदरीत परिस्थिती पाहता पाणीटंचाई जन्य परिस्थिती निर्माण  झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात शेती आणि पिण्यासाठी पाणी सोडण्यात येते परंतु यंदा मार्च महिना संपत आला तरी पाणी सोडण्यात आले नसल्याने शेतकरी व सर्व सामान्यांचे हाल होत आहेत यामुळे परिस्थिती लक्षात घेऊन तात्काळ इसापूर धरणातून पाणी सोडण्याचे निर्देश खासदार हेमंत पाटील यांनी  नांदेड पाटबंधारे मंडळ, यांच्याकडे आणि दोन्ही जिल्हाधिकारी नांदेड आणि यवतमाळ यांच्याकडे दूरध्वनी वरून संपर्क साधून दिले आहेत.

उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागासाठी आरक्षित करण्यात आलेले पाणी पैनगंगा नदीमध्ये इसापूर धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे सोडून नदीकाठावरील गावांना दिलासा द्यावा तसेच हदगाव, हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठच्या ग्रामीण भागामध्ये आता पासूनच तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्यामुळे या भागासाठी  सुद्धा आरक्षित करण्यात आलेल्या पाण्यामधून  पाणीटंचाई निवारणार्थ पैनगंगा नदीमध्ये पाणी सोडण्यात यावे .कळमनुरी ,उमरखेड शहराचा  पाण्याचा प्रश्न इसापूर धरणावर अवलंबुन आहे.त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी ,सर्व सामान्य जनता आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गंभीर बाब लक्षात घेऊन पाणीटंचाई पासून दिलासा देण्यात यावा.असेही  खासदार हेमंत पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine − four =

Close