January 21, 2022

इशारा न देताच लष्कराकडून गोळीबार

Read Time:3 Minute, 51 Second

कोहिमा : नागालँड गोळीबार घटनेला धक्कादायक वळण मिळाले असून गोळीबारातून जखमी झालेल्या व्यक्तीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दावा खोटा ठरवणारी माहिती दिली आहे. घटनास्थळावरुन आम्ही पळत नव्हतो; मात्र लष्कराने इशारा न देताच चारी बाजूंनी गोळीबार केल्याचे म्हटले आहे.

नागालँडमधील मोन जिल्ह्यात अतिरेक्यांच्या घुसखोरीची माहिती मिळाल्यानंतर लष्कराच्या २१ पॅरा कमांडो गटातील जवानांनी तिरू गावाभोवती गराडा घातला होता. संशयित अतिरेकी समजून वाहनाला थांबवण्याचा आदेश देण्यात आला. मात्र, या आदेशानंतरही वाहन न थांबता भरधाव गेल्याने जवानांनी वाहनावर गोळीबार केला.

या गोळीबारात वाहनातील ८ जणांपैकी ६ ठार झाले. वाहनामध्ये अतिरेकी नव्हे, तर खाण कामगार असल्याचे जवानांच्या लक्षात येताच त्यांनी दोन्ही जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. जवानांनी गैरसमजातून मजुरांवर गोळीबार केला, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेच्या दोन्ही सदनांत सोमवारी निवेदनाद्वारे दिली. मात्र आता हल्ल्यातून बचावलेल्या एका पीडित व्यक्तीने अमित शाह यांनी दिलेल्या माहितीच्या अगदी उलट सांगितले आहे. आपण पळत नव्हतो असे त्याने सांगितले असून कोणताही इशारा न देता जवानांनी गोळीबार केल्याचे त्याने म्हटले आहे. अमित शाह यांनी निवेदन देताना जवानांनी लोकांना थांबण्याचा इशारा दिला होता, मात्र ते धावत असल्याने गोळीबार केला असा दावा केला होता. गोळीबारातून दोन लोक वाचले असून त्यातील २३ वर्षीय शिवांगने ही माहिती दिली आहे. शिवांगच्या खांदा आणि छातीवर गोळी लागली आहे. त्याच्यावर आसाम मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरु आहे.

गोळीबाराबरोबरच बॉम्बस्फोटाचेही आवाज
संपूर्ण घटनाक्रम पुन्हा आठवताना शिवांगने सांगितले की, कोळसा खाणीत काम संपवल्यानंतर आम्ही पिक-अप ट्रकमधून घरी परतत होतो. त्याचवेळी अचानक आमच्यावर गोळीबार सुरु झाला. गोळीबार किती वेळ सुरु होता हे आठवत नाही, पण बॉम्बस्फोट झाल्यासारखेही आवाज होत होते. अंधारही झालेला नव्हता, तरीही ते गोळीबार करत होते. गोळीबार सुरु होताच आम्ही गाडीत खाली झोपलो. आम्हाला थांबण्याचा इशारा दिला नव्हता. आमच्यावर थेट गोळीबार करण्यात आला. आम्ही पळण्याचा प्रयत्न करत नव्हतो, असेही त्याने सांगितले आहे. मला न्ंतर एका दुस-या वाहनातून नेण्यात आले. माझ्या भावासह अनेकांचा मृत्यू झाल्याची मला तेव्हा कल्पना होती, असेही शिवांगने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 + 15 =

Close